scorecardresearch

पुणे : महिलेला पाण्यात बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न

पतीपासून वेगळे राहत असलेल्या महिलेवर अत्याचार करुन सराईताने तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पुणे : महिलेला पाण्यात बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न
( संग्रहित छायचित्र )

पतीपासून वेगळे राहत असलेल्या महिलेवर अत्याचार करुन सराईताने तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी सराईताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी शुभम संभाजी पाटील (वय ३०, रा. बकोरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडीत महिला आणि तिच्या पतीत वाद सुरू होते. गेल्या सहा महिन्यापासून पतीपासून वेगळी राहत आहे. तिला दहा वर्षांचा मुलगा आहे. आरोपी शुभम पाटील याच्याशी महिलेची ओळख होती. महिलेच्या असहायतेचा फायदा पाटीलने घेतला. तिच्यावर त्याने अत्याचार केले. पीडीत महिला एकाच्या संपर्कात होती. त्यामुळे पाटील तिच्यावर संशय घेत होता.

पाटीलने तिच्यावर अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. संशयातून त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेच्या दहा वर्षांच्या मुलासमोर त्याने प्रसाधनगृहातील बादलीत महिलेचे तोंड पाण्यात बुडवून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे पीडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. लोणीकंद पोलिसांनी पाटील याच्या विरोधात बलात्कार, खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.