सात लाखांचा ऐवज प्रवासी महिलेला परत
पुणे : रिक्षाप्रवासात प्रवासी महिलेची सात लाखांचा ऐवज असलेली पिशवी विसरल्यानंतर रिक्षाचालकाने पिशवी स्वारगेट पोलीस ठाण्यात परत करून प्रामाणिकपणाची प्रचिती दिली.
तुकाराम यादवराव काळे (रा. अक्षय हाइट सोसायटी, ससाणेनगर, हडपसर) असे प्रामाणिकपणाची प्रचिती दिलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. काळे यांनी महिलेची सात लाखांचा ऐवज असलेली पिशवी स्वारगेट पोलीस ठाण्यात आणून दिली. शोभा लुंकड (वय ५५, रा. बिबवेवाडी-कोंढवा रस्ता) या सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास लष्कर भागात खरेदीसाठी गेल्या होत्या. लुंकड यांच्या बरोबर त्यांची मुलगी होती. खरेदी करून त्या लष्कर भागातून रिक्षाने घरी जात होत्या. नेहरू रस्त्यावरील ढोले-पाटील चौक परिसरात त्यांच्या मुलाचे कार्यालय आहे. मुलाला भेटण्यासाठी त्या कार्यालयात गेल्या. गडबडीत त्या पिशवी रिक्षात विसरल्या. रिक्षात पाच लाखांचे ब्रेसलेट, हिरेजडीत दोन लाखांची कर्णफुले असा सात लाखांचा ऐवज होता.
त्यानंतर रिक्षाचालक काळे तेथून गेले. रिक्षात पिशवी विसरल्याचे निदर्शनास आल्यानंतर लुंकड यांनी त्वरित या घटनेची माहिती स्वारगेट पोलिसांना दिली. स्वारगेटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली खोमणे, कांबळे यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे रिक्षाचालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, रिक्षाचालक काळे यांना रिक्षात पिशवी दिसून आली. पिशवी घेऊन ते स्वारगेट पोलीस ठाण्यात गेले आणि ती पिशवी त्यांनी पोलीस निरीक्षक नाईकवाडी यांच्या ताब्यात दिली.
काळे यांनी प्रामाणिकपणाची प्रचिती दिल्याने त्यांचा पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सहायक आयुक्त सर्जेराव बाबर, नाईकवाडी या प्रसंगी उपस्थित होते.