पुणे : आजारपणामुळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांना विश्रांती घेण्याचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला आहे. घरी असलो तरी ऑनलाइन माध्यमातून बसल्या जागेवरून शक्य ते सहकार्य करेन, असे डॉ. आढाव यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले आहे.

वयाच्या ९२ व्या वर्षीही माझी तब्येत सुदृढ आहे. मात्र, हाडे ठिसूळ होण्याबरोबरच काहीशी कर्करोगासारख्या व्याधीची लागण झाल्याचे उजेडात आले आहे. योग्य ते उपचार सुरू असले तरी हालचालींवर मर्यादा आलेल्या आहेत. यातून बाहेर पडेन, अशी खात्री असल्याचे डॉ. आढाव यांनी प्रसिद्धिपत्रकामध्ये नमूद केले आहे. आजारामुळे व त्यावरील औषधोपचारामुळे व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी होत जाते. आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारचा संसर्ग होणे तब्येतीला धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कोणीही भेटायला येऊ नये, असे आवाहन डॉ. आढाव यांनी केले आहे.