पुणे : महापालिकेच्या मुख्य इमारतीबाहेर पथारी व्यवसायिकांनी कष्टकरी कामगारांचे नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्त्वात सोमवारी (१७ नोव्हेंबर) ठिय्या आंदोलन केले. महापालिकेच्या अतिक्रमण खात्याकडून मनमानी पद्धतीने कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप पथारी व्यवसायिकांच्या संघटनांनी केला आहे.

केंद्र शासनाच्या धोरणानुसार पथारी व्यवसायिकांसाच्या उपजीविकेचे संरक्षण करणे, ही महापालिकेची जबाबदारी आहे. मात्र, अतिक्रमण खात्याकडून त्याचे पालन करण्यात येत नाही. अतिक्रमण खात्याचे अधिकारी मनमानी पद्धतीने कारवाई करत असल्याचा आरोप पथारी व्यवसायिकांनी केला.

संघटनेचे अध्यक्ष मोहन चिंचकर म्हणाले,‘दर पाच वर्षांनी पथारी व्यावसायिकांचे सर्वेक्षण करून त्यांना प्रमाणपत्रे वितरित करणे आवश्यक असते. मात्र, महापालिकेकडून त्याची अंमलबजावणी केली जात नाही. पथारी व्यवसायिकचे प्रश्न सोडविण्यासाठी स्थापन केलेल्या शहर फेरीवाला समितीची बैठकही नियमितपणे घेतली जात नाही. अतिक्रमण विभागाचे अधिकारी मनमानी पद्धतीने कारभार करतात.’

‘पथारी व्यवसायिकांना भाडे आकारताना महापालिकेकडून कोणतेही निकष लावले जात नाहीत. त्यामुळे ठिकठिकाणी भाड्याचे दर अनियमित आहेत. मनमानी पद्धतीने भाडे ठरवले जाते. अधिकृत पथारी चालकांनाही मूलभूत सुविधाही दिल्या जात नाहीत. महिलांसाठी स्वच्छतागृहांची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. मूलभूत सुविधांच्या कमतरतेमुळे आरोग्याचे आणि सार्वजनिक स्वच्छतेचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत,’ असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, डॉ. बाबा आढाव यांनी महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे निवेदन देत पथारी व्यवसायिकांच्या प्रश्न सोडविण्यासंबंधी चर्चा केली. त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.

पथारी व्यवसायिकांच्या मागण्या

  • निकष ठरवून भाडे आकारले जावे
  • जप्तीची कारवाई पारदर्शकपणे करावी
  • भाडे भरलेल्या पथारी चालकांवरची कारवाई त्वरीत थांबवावी
  • पथारी चालकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
  • गटारी चालकांचे सर्वेक्षण आणि बायोमेट्रिक नोंदणी करावी
  • ‘हॉकिंग झोन’चे वाटप करून त्याचे सीमांकन करावे
  • पथारी चालकांसाठी अभय योजना जाहीर करून, ७५ टक्के दंड सवलत द्यावी

शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत पथारी व्यवसायिकांचे प्रश्न मांडण्यात येणार आहेत. त्यांनी केलेल्या मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईल. – सोमनाथ बनकर, उपायुक्त अतिक्रमण विभाग.

पथारी चालक शहराच्या विविध भागात भाजीपाला आणि इतर आवश्यक वस्तू पोहोचवतात. मात्र, त्यांच्या रोजगारावर गदा आणण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. – ॲड. सुषमा यादव, विधी सल्लागार, पथारी व्यवसायिकांची संघटना.