पुणे: महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी आणि अध्यक्षांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे राजीनामे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आणि अधिवेशन काळातच झाल्याने विरोधकांनी राज्य सरकारला विशेष करून भाजपला कोंडीत पकडले आहे. राज्य सरकारने आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे माध्यमात आल्यानंतर तातडीने निवृत्त न्यायाधीश सुनिल शुक्रे यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. नवे अध्यक्ष न्या. शुक्रे यांचा मराठा आरक्षणासाठीचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी शासनाकडून गेलेल्या शिष्टमंडळात समावेश होता. नियोजनानुसार आयोगाची बैठक शुक्रवारी (२२ डिसेंबर) रोजी पुण्यात होणार होती. मात्र, शुक्रे यांनी तीन दिवस आधीच ही बैठक बोलावली असून विधिमंडळाचे अधिवेशन नागपूर येथे सुरू असल्याने तेथेच ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत मराठा समाजाबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.

राजीनामा दिलेल्या सदस्यांच्या जागी ज्योतीराम चव्हाण, मच्छिंद्रनाथ तांबे, डॉ. मारुती शिकारे आणि डॉ. ओमप्रकाश जाधव या सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ही बैठक नागपूर विभागीय आयुक्तालयात १९ डिसेंबरला सकाळी ११.३० वाजता होणार आहे. बैठकीत मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी सदस्यांच्या सुचनांनुसार तयार करण्यात आलेले निकष अंतिम करण्यात येणार आहेत.

हेही वाचा… पिंपरी-चिंचवड महापालिकेत ६७१ कोटींचा ‘टीडीआर’ घोटाळा; आयुक्तांसह…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी आयोगाने तयार केलेल्या प्रश्नावलीप्रमाणे सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार आहेत. सर्वेक्षण कामासाठी ज्या संस्थांनी प्रस्ताव दिले आहेत, त्यावर निर्णय होणार आहे. आयोगाच्या कार्यालयाच्या नूतनीकरणाच्या अंदाजपत्रकाला मान्यता दिली जाणार आहे. मराठा समाजाच्या सर्वेक्षणाकरिता करायच्या कामकाजासाठी उपसमित्या नेमून कामाचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे या बैठकीत केवळ मराठा समाजाबाबतच्या विषयांवर चर्चा होणार आहे.