पुणे : येत्या शैक्षणिक वर्षात नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके बालभारतीकडून तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी १८ अधिकाऱ्यांची करार पद्धतीने नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून, २०२५-२६पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तके, पाठ्योत्तर साहित्याची निर्मिती करण्यासाठी बालभारतीला मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झाली आहे.
त्या अनुषंगाने १८ पदांच्या नेमणुकीसंदर्भात बालभारतीकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. बालभारतीने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, इंग्रजी, सिंधी, भूगोल, इतिहास आणि राज्यशास्त्र, कार्यानुभव, गणित, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण, शास्त्र या विषयांसाठी ८ विशेषाधिकारी, १० सहायक विशेषाधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. विशेषाधिकारी पदासाठी पूर्ण वेळ नियुक्तीनंतर सलग पाच वर्षे अध्यापन केल्याचा अनुभव, तर सहायक विशेषाधिकारी पदासाठी पूर्ण वेळ नियुक्तीनंतर सलग तीन वर्षे अध्यापनाचा अनुभव आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या अर्जासाठी ८ मेपर्यंतची मुदत देण्यात आली होती.
बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील म्हणाले, ‘आलेल्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. ही प्रक्रिया तातडीने करण्यात येणार आहे.’