पुणे : श्रावण महिन्यापाठोपाठ गौरी-गणपतीमुळे केळ्यांची मागणी वाढली आहे. मात्र, कमी झालेली लागवड, खरिपात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि आखाती देशांना निर्यात वाढल्याचा परिणाम म्हणून बाजारात केळ्यांचा काही प्रमाणात तुटवडा आहे. त्यामुळे दरात तेजी आली असून, मुंबई, पुण्यात किरकोळ विक्री प्रती डझन ५० ते ६० रुपयांनी सुरू आहे. ही तेजी नवरात्रापर्यंत कायम राहील, असे व्यापारी वर्गातून सांगण्यात येत आहे.

राज्यात जळगाव, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्याने केळी लागवड होते. त्यापैकी जळगावात सरासरी ६० हजार हेक्टरवर लागवड असते. यंदा केळ्यांच्या लागणीच्या वेळी अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यानंतर जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्याचा परिणाम केळी उत्पादनावर झाला आहे. संपूर्ण श्रावण महिन्यात केळ्यांचे दर तेजीत होते. श्रावणात उत्तर भारतातून मागणी वाढल्याने किरकोळ विक्री ५० रुपये डझनावर गेली होती. गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर केळ्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्या प्रमाणात बाजारात केळ्यांची उपलब्धता नाही. त्यामुळे दरात तेजी आली आहे.

मुंबई, पुण्यात आवक सरासरी इतकी जरुर आहे. मात्र, मागणी त्याहून जास्त असल्याने ही तेजी निर्माण झाली आहे. मुंबई-पुण्यात मागणीच्या तुलनेत ७० ते ८० टक्के इतकीच आवक आहे, अशी माहिती मुंबईच्या वाशी मार्केटमधील व्यापारी अशोक कांबळे आणि पुण्यातील व्यापारी फरोज साचे यांनी दिली आहे. ही तेजी नवरात्रापर्यंत कायम राहील, अशी शक्यताही व्यापारी व्यक्त करीत आहेत.

आखाती देशांना निर्यात वाढली

राज्यातून आखाती देशांना होणारी केळी निर्यात वाढली आहे. प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि यावल तालुक्यांतून ही निर्यात होत आहे.  निर्यातीच्या केळ्यांना शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सरासरी दोन हजार रुपये, तर स्थानिक विक्रीसाठी शेतकऱ्यांना सरासरी एक हजार रुपये दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी निर्यातीला प्राधान्य देत आहेत. निर्यातीत चांगली वाढ झाल्याचा परिणाम म्हणून स्थानिक बाजारात केळ्यांचा काही प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे, अशी माहिती रावेर येथील प्रयोगशील शेतकरी देवेंद्र राणे यांनी दिली आहे.

जळगावमधून निर्यातीत वाढ झाली आहे. मात्र, निर्यात वाढल्यामुळे बाजारात केळ्यांचा तुटवडा निर्माण झाला, असे म्हणता येणार नाही. अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे केळ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे काढणीला येणाऱ्या केळ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ६० हजार हेक्टर केळी लागवड क्षेत्र असते.

– संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव