बारामती : बारामतीतील विमान प्रशिक्षण घेताना विमानाचा अपघात झाला. शनिवारी सकाळी पावणे आठ वाजता ही दुर्घटना घडली. विमान लँडिंग करताना तांत्रिक बिघाड झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.
बारामती येथे एका प्रशिक्षण संस्थेचे हे विमान होते. सकाळी पावणे आठच्या सुमारास विमान लँडिंग करताता पुढचे चाक वाकडे झाल्याने हा अपघात झाला. त्यामध्ये कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात आले.
या ठिकाणी शिकाऊ पायलटला प्रशिक्षण दिले जाते. एका खासगी कंपनीचे प्रशिक्षण केंद्र आहे. त्यांच्याकडून देशभरातील पायलटला प्रशिक्षण दिले जाते. शनिवारी सकाळी पावणेआठ वाजता विमान लँडिंग करत असतानाच ही दुर्घटना घडली. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही.
संबंधित संस्थेचे देशभरात प्रशिक्षण केंद्र आहेत. २०२३ मध्ये या संस्थेच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये सहा महिन्यांत पाच वेळा दुर्घटना झाल्या होत्या. बारामतीतही यापूर्वी दुर्घटना झाल्या आहेत.
या कंपनीची मान्यता रद्द व्हावी, याबाबतचे पत्र काही दिवसांपूर्वी भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आले होते. या कंपनीच्या प्रशिक्षण केंद्रात सातत्याने अपघात होत आहेत. प्रशिक्षण देताना विशेष काळजी घेण्यात येत नसल्याचे भाजप युवा मोर्चाचे म्हणणे आहे. आता पुन्हा दुर्घटना घडली असल्याने त्यांची मान्यता रद्द करावी, अशी मागणी युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.