बारामती : ‘गेल्या ५१ वर्षांतील सर्वांत मोठा पाऊस बारामतीत झाला आहे. या पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्यांना योग्य ती मदत केली जाणार आहे. तशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना दिली.
गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टीमुळे बारामतीत अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच बारामती तालुक्यातील लिमटेक येथे नीरा डावा कालवा फुटल्याने कालव्यातील पाणी लोकवस्तीत शिरून अनेक नागरिकांच्या घरात घुसले. या पार्श्वभूमीवर सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पहाटेपासूनच नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. ‘आमच्या घरांचे नुकसान झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंची नासाडी झाली आहे. घरातील सर्व सामान पाण्यात गेले आहे. जेवढे नुकसान झाले आहे, तेवढी भरपाई सरकारकडून मिळावी,’ अशी मागणी घरांत पाणी शिरून नुकसान झालेल्या नागरिकांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘रविवारी दुपारपासून उशिरापर्यंत पाऊस पडला. बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यांची पावसाची वर्षाची सरासरी १४ इंच आहे. इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथे एका दिवसात १३ इंच पाऊस, तर इतर ठिकाणी ७ इंच पाऊस पडला. पावसाची परिस्थिती पाहून नीरा डावा कालवा बंद करण्यात आला होता. मात्र, तो बंद होण्यास ४८ तास लागतात. पाऊस जास्त असल्याने उंचवट्यावरील पाणी कालव्यामध्ये जाऊन कालवा फुटला.’‘पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करून पंचनामे सुरू आहेत. तसेच नागरिकांच्या घरात शिरलेल्या पाण्याचेही पंचनामे केले जात आहेत,’ असे पवार यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘बारामती शहरालाही पावसामुळे फटका बसला असून, शहरातील तीन इमारतींना भेगा पडल्या आहेत. त्याचेही ऑडिट करण्याच्या सूचना केल्या आहेत. नागरिकांनीही केंद्र सरकार, राज्य सरकार, नगरपालिका, तालुका पंचायत यांनी केलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अनेक जण आडमुठी भूमिका घेतात. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.’
पंचनामे करण्याचे काम सुरू – सुनेत्रा पवार
बारामतीमधील अतिवृष्टीनंतरच्या स्थितीची राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनीही पाहणी केली. ‘शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाला नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आहेत. झालेले नुकसान मोठे आहे. ते भरून येणार नाही; पण या नुकसानीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल,’ असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
१४ ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था
अतिवृष्टीमुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे आपत्तीग्रस्त नागरिकांसाठी नगर परिषदेमार्फत १४ ठिकाणी राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी सांगितले. नगर परिषदेमार्फत जळोची, तांदुळवाडी, रुई, कल्याणीनगर, कसबा-पतंगशाहनगर, शारदा प्रांगण येथील नगरपरिषद शाळा, शिवाजीनगर जिल्हा परिषद शाळा, पंचशीलनगर समाज मंदिर या ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी नगर परिषदेचे तीन कर्मचारी आणि अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. या ठिकाणी सुमारे २०० नागरिकांची राहण्याची आणि ६५० नागरिकांची जेवणासह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.
७० घरांमध्ये पाणी, २५ घरांची पडझड
अतिवृष्टीमुळे जळोची ओढ्यालगतच्या घरांना फटका बसला असून, ७० घरांमध्ये पाणी शिरले. २५ घरांची पडझड झाली. नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने जळोची येथील ओढ्यात वाहून जाणारा एक व्यक्ती आणि काटेवाडी येथील एका कुटुंबातील ७ नागरिकांना पाण्यातून बाहेर काढून सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले. शहरातील नागरिकांनी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बारामती नगर परिषदेच्या ८५५४९ २२४९४ या व्हॉट्सॲप क्रमांकावर अथवा ०२११२-२२२३०७/२२२४९४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पंकज भुसे यांनी केले आहे.