पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचाराला रंगत येऊ लागली असता, सर्वच पक्षांचे नेते माजी मंत्री आणि भोरचे माजी आमदार अनंतराव थोपटे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मदतीचा ‘हात’ मागत आहेत. त्यामुळे एके काळी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले, पण सध्या वयोमानामुळे राजकारणापासून दूर असलेले थोपटे पुन्हा चर्चेत आले आहेत. बारामतीचा निकाल हा भोरची काँग्रेसची मते कोणाच्या परड्यात जाणार यावर अवलंबून असल्याने प्रत्येकालाच थोपटेंचा हात हवा आहे.

बारामतीतून खासदार सुप्रिया सुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली नसली, तरी त्यांनी प्रचार आणि गाठीभेटी सुरू केल्या आहेत. सर्वांत आधी सुनेत्रा पवार या अनंतराव थोपटे यांना भेटल्या. त्यानंतर गेल्या २५ वर्षांपासून राजकीय वैर विसरून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनीही थोपटे यांची भेट घेतली. भोरची मते निर्णायक ठरणार असल्याने अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केलेले माजी राज्यमंत्री विजय शिवतारे हेदेखील थोपटे यांच्या भेटीला गेले. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी थोपटे यांची भेट घेतल्यानंतर बारामतीच्या निकालाचे भवितव्य थोपटे यांच्या हातात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – बीडमध्ये मराठा ध्रुवीकरणाचा शरद पवारांचा प्रयोग

बारामती लोकसभा मतदारसंघात बारामतीसह दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर आणि खडकवासला या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. त्यांपैकी दौंड, इंदापूर आणि पुरंदर या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची ताकद असल्याने मतांचे विभाजन होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा एके काळी राष्ट्रवादी काँग्रेसचा होता. मात्र, मागील तीन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत भाजपचा उमेदवार जास्त मते घेत आला आहे. आता भाजपचा उमेदवार नसल्याने संबंधित मते मिळविण्यासाठी प्रयत्न असणार आहे. या पार्श्वभूमीवर भोरमधील मतदारांचा कल हा निकालाची दिशा ठरविणार असल्याने अनंतराव थोपटे यांच्या भूमिकेला महत्त्व आले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे नेते हे थोपटेंच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा हात पाठीशी राहण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते.

हेही वाचा – रायगडात शेकापला लागलेली गळती थांबेना

भोर हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. सन १९७२ पासून हा मतदारसंघ थोपटे यांच्या ताब्यात आहे. सन १९९९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर २००४ च्या निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले. मात्र, २००९ पासून ते सक्रिय राजकारणापासून अलिप्त आहेत. तेव्हापासून सलग तीन निवडणुकांमध्ये त्यांचे चिरंजीव संग्राम थोपटे हे निवडून येत आहेत.

हेही वाचा – अवघ्या काही महिन्यांतच ‘गुलाबी रंग’ उडाला, भारत राष्ट्र समितीचे राज्यातील अस्तित्वच धोक्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील तीन लोकसभा निवडणुकांमध्ये थोपटे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना साथ दिल्याने त्यांना या मतदारसंघातून मते मिळाली आहेत. मात्र, या वेळच्या निवडणुकीमध्ये पवार कुटुंबीयांपैकी कोणाच्या पारड्यात मते टाकायची, हे थोपटे यांच्या भूमिकेवर ठरणार आहे. त्यामुळे सर्वजण थोपटे यांची भेट घेऊन मत आणि मनपरिवर्तनासाठी प्रयत्न करत आहेत. थोपटे हे २५ वर्षांचे वैर कायमचे विसरणार, की अजित पवार म्हणजे भाजपला साथ देणार, यावर बारामतीचा निकाल अवलंबून असेल.