बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या निळकंठेश्वर पॅनलने आघाडी घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजय साकार केल्यानंतर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग गटामधून रतनकुमार भोसले यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे.
या गटातून कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे बापूराव गायकवाड पिछाडीवर गेले आहेत. या कारखान्याचा पहिला निकाल जाहीर झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब गटातून विजयी झाले आहेत. अनुसूचित जाती- जमाती प्रवर्ग गटाची मोजणी अंतिम टप्प्यात आली असून भोसले यांनी आघाडी घेतली आहे.
या निवडणुकीत ब गट आणि अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग गटाशिवाय आणखी सहा गट आहेत. या गटांची मतमोजणी अद्याप सुरू झालेली नाही. त्यामध्ये गट १- माळेगाव, गट २ -पणदरे, गट ३ सांगवी-कांबळेश्वर, गट ४ – खांडज-शिरवली, गट ५ – नीरा-वागज, गट ६ -बारामती यांचा समावेश आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ‘श्री नीळकंठेश्वर पॅनेल’, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ‘बळीराजा सहकार बचाव पॅनेल’, कारखान्याचे माजी अध्यक्ष, भाजपचे नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचे ‘सहकार बचाव शेतकरी पॅनेल’ आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचे पॅनेल यांच्यात चौरंगी लढत आहे.