बारामती: बारामती शहर व परिसरात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागाची युवा नेते युगेंद्र पवार यांनी पाहणी केली. संकटग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
शहरासह जळोची, मलगुंडे वस्ती, एमआयडीसी चौक, रुई गावठाण, तांदूळवाडी या भागात युगेंद्र पवार यांनी भेटी देत अतिवृष्टीने बाधित झालेल्यांशी संवाद साधला. शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनीही काही भागात भेटी दिल्या होत्या. युगेंद्र पवार यांच्या हस्ते १४ ठिकाणी नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
युगेंद्र पवार म्हणाले, ‘ग्रामीण भागाचा बुधवारी दौरा केला जाणार आहे. शहर व परिसरात भरपूर नुकसान झाले आहे. बाधितांना राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टकडून आवश्यक ती मदत केली जाणार आहे. काही ठिकाणी इमारती, रस्ते खचले आहेत. काही भागात आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन उपाययोजना करण्याची मागणी करणार आहे. तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे नुकसानीचे पंचनामे आणि मदतीसाठी पाठपुरावा करणार आहे.’