लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेला धमकावून एकाने तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना येरवड्यातील फुलेनगर परिसरात घडली. या प्रकरणी चौघांच्या विरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका ३० वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला भीक मागून उदरनिर्वाह करते. येरवड्यातील फुलेनगर परिसरात प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ (आरटीओ) मोकळ्या मैदानावर महिला आणि तिचे कुटुंबीय राहतात. रात्री ती पदपथावर झोपते. आरोपी पीडित महिलेच्या नात्यातील आहेत, असे तिने फिर्यादीत म्हटले आहे.
आणखी वाचा- पिंपरी: पुनावळेत सुरक्षा रक्षकाकडून सात वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
रात्री बाराच्या सुमारास महिला मोकळ्या मैदानात गेली होती. त्या वेळी तिला एका आरोपीने धमकावून तिच्यावर बलात्कार केला. महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक गाताडे तपास करत आहेत.
