पुणे : ‘राज्यात उत्पादित होत असलेल्या फळे, पिकांची निर्यात वाढविण्यासाठी समूह विकास केंद्र (क्लस्टर डेव्हलपमेंट) वाढविण्यात येणार आहे. त्याचबरोबर या ‘जीआय मानांकन प्राप्त’ फळे, पिकांना विशिष्ट ओळख (ब्रँडींग) निर्माण करून देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे,’ अशी ग्वाही रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री भरत गोगावले यांनी पुण्यात दिली.
दरम्यान, सुपारी पिकाचा भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये, तर कलमे-रोपे पुरवठ्यासाठी कुशलची रक्कम शासकीय रोपवाटिकेस देऊन खजूर पिकाचा समावेश महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत करण्यासाठी आणि राेपवाटिका बळकटीकरणासाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासंदर्भात प्रशासकीय स्तरावर तातडीने प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे पाठविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
साखर संकुल येथे राज्यातील फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाचे (स्मार्ट) संचालक डॉ. हेमंत वसेकर, विस्तार व प्रशिक्षण संचालक रफिक नाईकवडी, कृषी प्रक्रिया व नियोजन संचालक विनयकुमार आवटी तसेच ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, विभागांचे विभागीय कृषि सह संचालक उपस्थित होते.
गोगावले म्हणाले, ‘राज्यातील फलोत्पादनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी शासन स्तरावर नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. कोकणामध्ये सुपारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र, या पिकाचा भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत समावेश नाही. अतिवृष्टी काळात या पिकाला मोठा फटका बसतो. रोपवाटिका कमी होत चालल्या असून, त्या वाढविण्याच्या दृष्टीने आर्थिक आणि भौगोलिक स्तरावर तपासणी करावी. त्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागातील भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊन कामकाज करावे. वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. फळे, पिकांचे उत्पादन वाढले, तरच महसूल वाढेल.’
‘संयमाने चालणे गरजेचे…’
रायगडच्या पालकमंत्री पदावरून त्यांना प्रश्न विचारला असता, ‘आम्ही रायगडचे मावळे आहोत, आम्ही शांत होण्याचे काहीच कारण नाही. संयमाने चालणे गरजचे आहे. त्याप्रमाणे आम्ही चालत आहोत. काही गोष्टी सबुरीनी घ्याव्या लागतात. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निश्चित निर्णय घेतील. रायगडवासीयांचे स्वप्न पूर्ण होईल,’ अशी भूमिका त्यांनी मांडली.