विज्ञान क्षेत्रातील संशोधनाबद्दल केंद्र शासनाकडून देण्यात येणारा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार पुण्यातील प्रा. योगेश मोरेश्वर जोशी, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील संशोधक डॉ. डी. श्रीनिवास रेड्डी यांच्यासह देशातील अकरा संशोधकांना जाहीर झाला आहे.
विज्ञान क्षेत्रातील संशोधनासाठी केंद्र शासनाच्या विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेकडून शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार देण्यात येतो. अभियांत्रिकी शाखेतील संशोधनाबद्दल प्रा. जोशी यांना हा पुरस्कार देण्यात अाला. ते गेली दहा वर्ष आयआयटी कानपूर येथे रासायनिक अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. विविध रासायनिक द्रव्यांचे वहन या विषयावर त्यांचे ६० शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. सन्मानपत्र आणि ५ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
राष्ट्रीय विज्ञान प्रयोगशाळेतील संशोधक डॉ. रेड्डी यांना आणि कोलकता येथील इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेतील डॉ. प्रद्युत घोष यांना रसायनशास्त्रातील संशोधनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. जीवशास्त्रातील संशोधनासाठी बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स येथील डॉ. बालसुब्रमण्यम गोपाल आणि हैदराबाद येथील इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिटय़ूट येथील डॉ. राजीव वाष्र्णेय यांना देण्यात येणार आहे. भूविज्ञान शास्त्रातील संशोधनासाठी अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी येथील डॉ. ज्योतीरंजन रे यांना तर वैद्यकीय शास्त्रातील संशोधनासाठी मुंबई येथील टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेतील डॉ. विदिता वैद्य यांना देण्यात येणार आहे. भौतिकशास्त्रासाठी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेतील डॉ. बेदंगदास मोहंती यांना आणि मुंबई येथील टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेतील डॉ. मंदार देशमुख यांना देण्यात येणार आहे. गणितातील संशोधनासाठी टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेच्या बंगळुरू येथील डॉ. के. संदीप आणि मुंबई केंद्रातील डॉ. रितब्रता मुन्शी यांना देण्यात येणार आहे.