महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात जिथे देशातली मुलींची पहिली शाळा सुरू केली, त्या भिडे वाड्याच्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. कारण, भिडे वाड्यासंदर्भातला सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला खटला पुणे महापालिका आणि राज्य सरकारने जिंकला आहे. त्यामुळे लवकरच या शाळेच्या ठिकाणी स्मारक उभारलं जाईल. स्मारकाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

भिडे वाड्यासंदर्भातील वाद लवकर निकाली निघावा यासाठी त्या जागेचे मूळ मालक असलेल्या पुना मर्चंट बँकेचे चेअरमन विजय ढेरे यांच्याशी अलिकडेच चंद्रकांत पाटील यांनी चर्चा केली होती. भिडे वाड्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता तेथे राष्ट्रीय स्मारक होणे महत्त्वाचे आहे. हे स्मारक राज्यातील नव्हे तर देशातील महिलांचे प्रेरणास्थान ठरणार असल्याने पुना मर्चंट बँकेने सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले होते. पाटील यांच्या आवाहनास ढेरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, बँकेचे सर्व सभासद आणि भाडेकरू यांच्याशी चर्चा करून सहकार्याची भूमिका घेण्याबाबत आश्वस्त केले होते.

हे ही वाचा >> “शासकीय जागेवर बिल्डरची नजर असतेच”, मीरा बोरवणकरांचा पुन्हा आरोप, म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातल्या बुधवार पेठ परिसरातील भिडे वाड्यात मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू केली. या भिडे वाड्याचं राष्ट्रीय स्मारक व्हावं, अशी मागणी ‘मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक समिती’च्या वतीने पुढे आली होती. त्याला पुणे महापालिका आणि राज्य सरकारनेही अनुकूलता दर्शवली. परंतु, हे प्रकरण न्यायालयात अडकलं होतं. आता या स्मारकासमोरचा न्यायालयीन पेच सुटला असून लवकरच भिडे वाड्याच्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारलं जाईल.