पुणे : दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना सुवर्ण पिंपळ बीजाभिषेक करून बायोस्फिअर्स संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शिवराज्याभिषेकदिनी अनोखी मानवंदना दिली. बायोस्फिअर्स संस्था, कोकण कडा मित्रमंडळ, शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, माउली हरित अभियान, मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन यांच्या संयुक्त विद्यमाने रायगडाच्या सदरेवर देववृक्ष सुवर्ण पिंपळाच्या बीजाचा बीजाभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांना करण्यात आला.

डॉ. सचिन पुणेकर, कोकण कडा मित्रमंडळ, परेश सोनावणे, नितीन सकपाळ, तेजस पवार, प्रकाश स्वामी, सुधाकर महाराज इंगळे, अमित पायगुडे, गिरीश गोखले, गणपत चोर-साळुंके या वेळी उपस्थित होते. सुवर्ण पिंपळ बीज-प्रसादाचे शिवप्रेमी, वारकरी व स्थानिक गावकरी यांना वाटप करण्यात आले. या वारसा वृक्षाबाबतच्या सचित्र माहिती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.