BJP Congress fight Kasba Hemant Rasane faces tough challenge Ravindra Dhangekar ysh 95 | Loksatta

कसब्यात भाजप-काँग्रेसमध्ये लढत, हेमंत रासने यांना रवींद्र धंगेकर यांचे कडवे आव्हान

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात लढत होणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.

congress against bjp hemant rasane
कसबा मतदारसंघात भाजपकडून हेमंत रासने तर काँग्रेसचे उमेदवार म्हणून रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात लढत होणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. हेमंत रासने यांना रवींद्र धंगेकर यांच्याकडून कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार असल्याने भारतीय जनता पक्षासाठी कसबा पोटनिवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. 

कसबा विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने हेमंत रासने यांना तर महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसच्या वतीने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. कसबा पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानुसार सोमवारी सकाळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रवींद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा केली. धंगेकर यांनी यापूर्वी कसबा विधानसभा निवडणुकीत दिलेल्या कडव्या लढतीमुळे पोटनिवडणूकही चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारतीय जनता पक्षाने पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने या ब्राह्मणेतर उमेदवाराला संधी दिल्याने कसब्यातील ब्राह्मण समाजात नाराजीचे वातावरण आहे. हिंदू महासभेनेही निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केल्याने भाजपच्या पारंपरिक मतपेटीवर त्याचा परिणाम होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. सन २००९ ची विधानसभा निवडणूक रवींद्र धंगेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लढविली होती. त्यावेळी त्यांनी विद्यमान खासदार गिरीश बापट यांना कडवे आव्हान दिले होते. त्या निवडणुकीत गिरीश बापट यांना सात हजार मतांनी निसटता विजय मिळाला होता. त्यामुळे त्यांना रोखण्याचे आव्हान हेमंत रासने आणि भाजप नेतृत्वापुढे असणार आहे. रवींद्र धंगेकर यांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेनेची ताकद आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेची युतीमध्ये भाजपला मोठी मदत झाली होती.

बंडखोरीमुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्याने काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. बाळासाहेब दाभेकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यातच काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, माजी मंत्री रमेश बागवे आणि त्यांचे चिरंजीव, माजी नगरसेवक अविनाश बागवे दोघे काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चाही सुरू झाल्याने पोटनिवडणुकीपूर्वी काँग्रेसपुढील अडचणीत वाढ झाली आहे. दाभेकर यांचे बंड थोपविण्याचे प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत आहेत.  कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी, अशी मागणी बाळासाहेब दाभेकर यांनी केली होती.  काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांचे नाव जाहीर केले. धंगेकर यांनी  सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

‘चिन्हांबाबत तातडीने निर्णय नाही’

नवी दिल्ली: शिवसेनेतील दोन गटांना तात्पुरती चिन्हे देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील सध्याच्या दोन पोटनिवडणुकीत ती वापरता येऊ शकतात असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात लवकच आयोगाकडून अंतिम आदेश दिला जाईल ही शक्यता फेटाळून फेटाळली आहे. या दोन्ही ठिकाणी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 00:02 IST
Next Story
बारामती मतदारसंघात भाजपची मतपेरणी; मतदारसंघातील महत्त्वाच्या कामांना मंत्रिमंडळाची मंजुरी