पुणे : आगामी महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग रचना करताना शहरातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी कोणतीही चर्चा न केल्याने या दोन्ही पक्षांच्या शहर पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. ही प्रभाग रचना नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आली आहे. यामध्ये शिवसेना (शिंदे) पक्षाच्या दृष्टिने सकारात्मक बदल व्हावेत, यासाठी शिवसेना (शिंदे) पक्षाच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी आता थेट मुंबईचा रस्ता धरल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महापालिकेने प्रभाग रचना करताना भाजपने विश्वासात न घेता परस्पर प्रभाग रचना करून घेतली. आता हा आराखडा अंतिम मान्यतेसाठी नगर विकास विभागाकडे पाठविण्यात आला असून, ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात हा आराखडा प्रसिद्ध केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात्याचा कारभार असल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रभागांमध्ये काही बदल करत शिवसेनेला फायद्याची ठरेल, असा निर्णय घ्यावा, यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई गाठून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचे नियोजन केल्याचे सूत्रांनी सांगितले.
महापालिकेत भाजपचे पदाधिकारी प्रभाग रचनेसाठी प्रयत्नशील होते. त्यांनी त्यांच्या फायदाची प्रभाग रचना करून घेतल्याची चर्चा आहे. तर, नगरविकास विभाग एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभाग रचनेत झुकते माप मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचबरोबर भाजपने विश्वासात न घेतल्याने आता थेट नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या उमेदवारांसाठी काही प्रमाणात प्रभाग रचना फायद्याची कशी करता येईल, यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजन सुरू केले आहे.
महापालिकेसाठी भाजप स्वबळासाठी आग्रही ?
महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीत सहभागी असलेले भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष एकत्र लढणार की स्वबळावर यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. गेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने महापालिकेत १०० चा आकडा गाठला होता. त्यातच आता केंद्रात आणि राज्यात भाजप खासदार आणि आमदारांचे संख्याबळ अधिक असल्याने महापालिका निवडणुकांमध्ये देखील भाजप स्वबळावर सत्ता मिळू शकतो. त्यामुळे महायुतीतून या निवडणुका न लढता स्वबळावर लढविण्याचा निर्णय घ्यावा, यासाठी शहर भाजपमधील पदाधिकारी आग्रही आहेत. महायुतीत निवडणूक लढविण्याचा निर्णय झाल्यास मित्र पक्षांना जागा द्याव्या लागतील, त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता असल्याने ही निवडणूक स्वतंत्र लढाई अशी मागणी भाजप मधून वरिष्ठ नेत्यांकडे केली जात आहे.
स्थायी समिती अध्यक्ष केले, आता त्याच्याशी बोलू का?
‘प्रभाग रचना करताना शहरातील भाजपचे पदाधिकारी महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्यांना विश्वासात घेत नाहीत. एका बैठकीलाही बोलवत नाही, भाजपचा पदाधिकारी प्रभाग रचनेत लक्ष घालत आहे. किमान त्यांच्याशी बोलावे,’ अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) पदाधिकाऱ्याने वरिष्ठ नेत्याकडे केली. त्यावर ‘ज्याला कधी स्थायी समितीचा अध्यक्ष केले होते, आता त्याच्याशी प्रभाग रचनेबाबत मी बोलू का,’ असा प्रतिप्रश्न या नेत्याने उपस्थित केल्याचे समजते.