पुणे : ‘महाराणा प्रताप यांच्यानंतर आता शहीद भगतसिंग यांच्याबद्दल अपशब्द काढले गेले. अशी वक्तव्ये करणाऱ्या राजकीय नेत्यांना इतिहासाची माहिती नसते. सध्या इतिहासाचा अभ्यास नसणे आणि असल्यास त्या अभ्यासाचा बुद्धिभ्रम निर्माण करण्यासाठी होणारा वापर चिंतेचा विषय आहे,’ अशा शब्दांत भाजपच्या राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेतला.

‘खरा इतिहास समोर आणण्यासाठी आपल्या लोकांनी लिहायला हवे,’ असेही त्यांनी नमूद केले.

मोहिनी पेशवा-करकरेलिखित ‘रिजेंट क्वीन ऑफ इचलकरंजी अनुबाईसाहेब घोरपडे’ या पुस्तकाचे प्रकाशन मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. उदय कुलकर्णी, भारत इतिहास संशोधक मंडळाचे सचिव पांडुरंग बलकवडे या वेळी उपस्थित होते.

कुलकर्णी म्हणाल्या, ‘मध्यंतरी शनिवारवाड्याच्या प्रकरणाबद्दल बरीच चर्चा झाली. त्यासंदर्भात राज्याबाहेरील एका अमराठी व्यक्तीबरोबर बोलत असताना त्यांना मराठ्यांच्या इतिहासाबाबत अनेक गैरसमज असल्याचे लक्षात आले. पेशव्यांच्या काळात तगडे प्रतिस्पर्धी नसल्यामुळे त्यांना साम्राज्य विस्तार करता आला, असा त्यांचा समज होता. अशा लोकांचा प्रतिवाद करण्यासाठी राजकारण्यांनी इतिहासाचे वाचन करणे आवश्यक असते.’

‘अमराठी लोकांपर्यंतही आपला गौरवशाली इतिहास पोहोचावा म्हणून प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी इथल्या इतिहास अभ्यासकांनी मराठीसह इतर भाषांमधूनही लिहायला हवे. त्या लिहित्या हातांना राजकारण्यांनी प्रोत्साहन द्यायला हवे. सध्या आपला समृद्ध वारसा सांगणाऱ्या अभ्यासकांची कदर असलेले सरकार सत्तेत आहे,’ असेही त्या म्हणाल्या.

डॉ. उदय कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. बलकवडे यांनी घोरपडे घराण्याच्या इतिहासावर भाष्य केले. करकरे यांनी आभार मानले.

‘घोरपडे वाड्याचे संवर्धन करणार’

‘अनुबाई घोरपडे यांनी त्या काळात जे काही केले ते अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. अशा कर्तृत्ववान स्त्रिया मराठ्यांच्या इतिहासात होत्या. त्यांनी वेळप्रसंगी घोड्यावर बसून लढायाही केल्या आहेत. अनुबाई घोरपडे यांच्यासारख्या स्त्रियांचा इतिहास हा आपला वारसा आहे. तो जपण्यासाठी प्रयत्न करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे घोरपडे यांच्या इचलकरंजी येथील वाड्याच्या संवर्धनासाठी खासदार निधीतून मदत करणार आहे,’ असे आश्वासन राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दिले.

व्यक्तिपूजा म्हणजे इतिहास नसतो. इतिहास लिहिताना त्यावेळच्या चुकांवरही बोट ठेवावे लागते आणि चुकांचे अवलोकन करून त्या पुन्हा होणार नाहीत, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते. आपण लढलो म्हणून इथले गड-किल्ले अजूनही उभे आहेत. शनिवारवाडा जाळला गेला. ती दुःखद घटना होती. आता मात्र शनिवारवाडा नव्याने उभारायचा आहे. – डॉ. मेधा कुलकर्णी, राज्यसभा खासदार, भारतीय जनता पक्ष.