पिंपरीत राष्ट्रवादीकडून नढे, तापकीर रिंगणात; शनिवारी निवडणूक

पिंपरी : नाटय़मय घडामोडीनंतर पिंपरी-चिंचवडच्या महापौर पदाची सत्तारूढ भाजपची उमेदवारी ज्येष्ठ नगरसेवक राहुल जाधव यांच्या पदरात पडली. कोणीही इच्छुक नसलेल्या उपमहापौर पदावर प्रथमच निवडून आलेल्या सचिन चिंचवडे यांची वर्णी लावण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन्ही पदांसाठी अनुक्रमे विनोद नढे व विनया तापकीर यांना रिंगणात उतरवले आहे. संख्याबळातील फरकामुळे कोणतीही चुरस नसलेली ही निवडणूक शनिवारी (४ ऑगस्ट) पार पडणार आहे.

महापौर पदासाठी मंगळवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत उमेदवारी अर्ज भरण्यात येणार होते. त्यामुळे काही दिवसांपासून असलेली उमेदवारीविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. राष्ट्रवादीने नढे व तापकीर यांचे अर्ज दाखल करून निवडणूक बिनविरोध न करण्याचे मनसुबे स्पष्ट केले. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले.

त्यानंतर, भाजपने जाधव आणि चिंचवडे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. जाधव हे आमदार महेश लांडगे यांचे, तर चिंचवडे हे आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक आहेत.

माळी समाजाला संधी

महापौरपदाच्या उमेदवारीसाठी शत्रुघ्न काटे व नामदेव ढाके शेवटपर्यंत स्पर्धेत होते. मात्र, त्यांना डावलण्यात आल्याने ते नाराज झाले. काटे व ढाके गेल्या वर्षी महापौर पदासाठी आग्रही होते. आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नांमुळे तेव्हा नितीन काळजे यांची वर्णी लागली. याही वेळी त्याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली. लांडगे यांनी प्रतिष्ठेचा प्रश्न करत राहुल जाधव यांना उमेदवारी मिळवून दिली.