|| अविनाश कवठेकर
भाजपची भिस्त शहरी तर राष्ट्रवादीची मदार ग्रामीण भागावर:- खडकवासला विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील नगरसेवक सचिन दोडके यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे. लोकसभेसाठी हा मतदार संघ बारामती मतदार संघात येतो. या मतदार संघाचा जो भाग शहरात येतो त्या भागातील भाजपला मानणाऱ्या मतदारांचे प्रमाण लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसची भिस्त ग्रामीण भागातील मतदारांवर राहणार आहे. वरकरणी ही लढत सरळ दिसत असली, तरी ही लढत लक्षवेधी ठरणार आहे. ग्रामीण विरुद्ध शहरी अशीच ही लढत असून भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
खडकवासला विधानसभा मतदार संघ अस्तित्वात आल्यानंतर या भागात प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व राहिले. सन २००९ च्या निवडणुकीत या मतदार संघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार रमेश वांजळे यांनी विजय मिळविला. त्यानंतर त्यांच्या निधनामुळे या मतदार संघात पोटनिवडणूक झाली आणि भाजपचे भीमराव तापकीर या मतदार संघातून विजयी झाले. त्यानंतर सन २०१४ मध्येही भीमराव तापकीर यांच्या रूपाने भाजपचेच या मतदार संघावर वर्चस्व राहिले.
गेल्या पाच वर्षांत या मतदार संघातील भाजपची ताकद मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. मतदार संघातील शहरी भागात महापालिकेतील नगरसेवकही मोठय़ा संख्येने आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकतर्फी विजय मिळविला होता. मात्र सध्या राजकीय परिस्थिती बदलली आहे. लोकसभा मतदार संघात येत असल्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी पाच वर्षांत या मतदार संघात अनेक विकासकामे केली. ही बाब राष्ट्रवादी काँग्रेससाठी जमेची आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी या मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेक जण इच्छुक होते. इच्छुकांची वाढती संख्या लक्षात घेता पाच नावांमधून एक नाव निश्चित करण्यात आले. त्यानुसार सचिन दोडके यांना उमेदवारी मिळाली. सुप्रिया सुळे यांनी केलेली विकासकामे, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे ग्रामीण भागात असलेली नातीगोत्यांमुळे भाजपपुढे तगडे आव्हान आहे.
बारामती लोकसभा मतदार संघाअंतर्गत खडकवासला विधानसभा मतदार संघ येतो. या मतदार संघातून सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळाले नव्हते. राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांना या मतदार संघात मोठे मतदान झाले होते. त्यामुळे गेल्या निवडणुकीच्या वेळी सुळे यांना विजयासाठी संघर्ष करावा लागला होता. या निवडणुकीपूर्वी सुळे यांनी खडकवासला मतदार संघावर लक्ष केंद्रित केले होते. या मतदार संघात विकासकामे, उद्घाटने करत त्यांनी जनसंपर्क वाढविला होता. मात्र त्यानंतरही यंदा प्रतिस्पर्धी उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या कांचन कुल यांना या मतदार संघातून मताधिक्य मिळाले. खडकवासला मतदार संघातून कांचन कुल यांना १ लाख ५२ हजार ४८७ मते मिळाली. तर सुळे यांना ८६ हजार ९९३ मते मिळाली. कुल यांनी येथून ६५ हजार ४९४ मतांची आघाडी घेतली, हीच बाब भाजपचे वर्चस्व स्पष्ट करणारी आणि मतदारांचा कौल सांगणारी असल्याचा दावा भाजकडून केला जातो.