पुणे : माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला रिकामे करण्याची सूचना कार्यकर्त्यांना केली. तिकीट देताना भाजप आधी आपल्या कार्यकर्त्यांचा विचार करत असल्याचे सांगून आपले काय होईल याचा विचार न करता अधिकाधिक पक्षप्रवेश करण्याचा सल्ला बावनकुळे यांनी दिला.
भाजपचे नवनियुक्त मंडल अध्यक्ष, कार्यकर्त्यांचा मेळावा डी. पी. रस्ता येथील शुभारंभ लॉन्स येथे झाला. त्यावेळी बावनकुळे बोलत होते. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महासचिव राजेश पांडे यांच्यासह आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.
मेळाव्यात काही पक्षप्रवेशही करण्यात आले.विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाबाबत बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. नवनियुक्त मंडल अध्यक्षांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. माजी आमदार संग्राम थोपटे यांचे नाव घेऊन बावनकुळे म्हणाले, ‘संग्राम थोपटेंसारखे काँग्रेसचे जेवढे कोणी कार्यकर्ते असतील तेवढे भाजपमध्ये घेऊन या. काँग्रेस पक्ष रिकामा करून टाका. काँग्रेस पक्ष जेवढा कमी कराल तेवढा तुमचा फायदा आहे. अधिकाधिक कार्यकर्ते आणून पक्ष मजबूत करा. तुमचे काय होईल याची चिंता करू नका. भाजप तिकीट देताना आपल्या कार्यकर्त्यांचा आधी विचार करतो.’
‘मंडळे, महामंडळांवर कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. महायुतीमध्ये कोणाला किती जागा हे ठरले आहे. तसेच जिल्हा, तालुकास्तरीय समित्या मिळून १४ ते १५ हजार नेमणुका केल्या जाणार आहेत. कोणीही काळजी करायची, निराश होण्याची गरज नाही. सत्ता आणि संघटन ही दोन चाके शंभरच्या वेगाने पळवायची आहेत. राज्यातील १० मंत्री प्रत्येक जिल्ह्यात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. या मंत्र्यांना भाजपकडून स्वीय सहायक दिला जाणार आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते सरकारचा फायदा घेतात, तसा भाजपच्या कार्यकर्त्यांनीही करून घेतला पाहिजे,’ असेही त्यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी?
‘न्यायालयाला हवी असलेली सर्व कागदपत्रे दिली आहेत. त्यामुळे येत्या बुधवारी न्यायालयाचा निकाल आल्यास १५ ऑगस्टनंतर निवडणुका होतील,’ असे बावनकुळे यांनी सांगितले. तर चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ यांनी वर्षाअखेरीस निवडणुका होतील, असे भाकीत वर्तवले.