चौकशी करण्याचीही भाजप प्रदेश कार्यकारिणीची ठरावाद्वारे मागणी
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये कारवाई सुरू असतानाच आता त्या सरकारच्या कालखंडात झालेल्या भूखंड वाटपाचीही सखोल चौकशी करून राज्य शासनाने श्वेतपत्रिका प्रकाशित करावी, अशी मागणी करणारा ठराव भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीमध्ये रविवारी संमत करण्यात आला. या ठरावामुळे आघाडी सरकारमधील मंत्र्यांची भाजपकडून अधिक कोंडी करण्याचा प्रयत्न पुढील काळात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.




राज्यात १९९९ ते २०१४ या कालखंडात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार सत्तेवर होते. या १५ वर्षांत आघाडी सरकारने अनेक भूखंडांचे वाटप केले. त्यातील काही प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे, तर काही भूखंड अनधिकृतपणे हडपले गेले आहेत. या साऱ्या भूखंड वाटप व्यवहारांची चौकशी करून सरकारने श्वेतपत्रिका प्रकाशित करावी, अशी मागणी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आली. यासंदर्भात ठराव करण्यात आला असल्याचे भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी रविवारी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
आघाडी सरकारच्या काळातील लॉटरी घोटाळ्याचा पूर्ण छडा लावावा. यामध्ये बडे राजकीय नेते अडकले असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशीही मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजीराजे यांचा प्रदेश बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या बैठकीपासून ते भाजपमध्ये सक्रिय झाले असल्याचे भंडारी यांनी सांगितले.
हा वादाचा मुद्दा नाही
‘जलयुक्त शिवार’ योजनेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली असल्याचे निदर्शनास आणून देताच, जलयुक्त शिवार योजनेचे श्रेय घेणे हा वादाचा मुद्दाच नाही. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशातून ही योजना सुरू केली असल्याचे माधव भंडारी म्हणाले.
‘नाथाभाऊं’बाबत निष्कर्ष काढलेला नाही
आरोपांच्या अग्निपरीक्षेतून नाथाभाऊ बाहेर पडतील, हे मुख्यमंत्र्यांचे विधान हा एकनाथ खडसे यांच्याबाबत निष्कर्ष आहे का?, या प्रश्नाबाबत माधव भंडारी यांनी, मुख्यमंत्र्यांनी कोणताही निष्कर्ष काढलेला नाही, असा दावा केला. खडसे यांच्यावरील आरोपांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मोजक्या आणि स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. त्यामुळे या विषयावर मी काही बोलावे असे उरलेले नाही. खडसे यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही ही सर्वाचीच भावना आहे. न्यायालयीन चौकशीची कार्यकक्षा ठरेल. त्यातून खडसे बाहेर पडतील हा विश्वास आम्हाला आहे. त्यामुळे नाथाभाऊंबाबत कोणताही निष्कर्ष काढलेला नाही, असेही भंडारी यांनी सांगितले.