केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळाल्यानंतरही भारतीय जनता पक्षाची पिंपरी-चिंचवड शहरातील अवस्था दयनीय स्वरूपाची होती. पवार काका-पुतण्याच्या तालमीत तयार झालेले नेतृत्व आयात झाल्यानंतर भाजपची परिस्थिती झपाटय़ाने सुधारली. अल्पावधीत पिंपरी महापालिकेतील सत्ताप्राप्तीचे फळही भाजपच्या पदरात पडले. मात्र सत्ता मिळाल्याचा आनंद भाजप कार्यकर्त्यांमध्ये फार काळ टिकला नाही. बहुतांश कार्यकर्ते असमाधानी आहेत. ‘जुने आणि नवे’ असा सुंदोपसुंदीचा खेळ काही महिन्यांपासून सुरू असून आता तो गंभीर वळणावर आला आहे. पक्षातील कार्यकर्ते वेगवेगळय़ा मार्गाने त्यांची अस्वस्थता आणि खदखद व्यक्त करत आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या पिंपरीतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासमक्ष माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे व सरचिटणीस प्रमोद निसळ यांच्यात जोरदार बाचाबाची झाली आणि शहर भाजपतील सुप्त गटबाजी पुन्हा चव्हाटय़ावर आली. तसे पाहता शहर भाजप आणि गटबाजी हे समीकरण जुनेच आहे. पूर्वी स्थानिक नेत्यांमध्ये गट-तट होते. ‘मुंडे गट व गडकरी गट’ अशी नेत्यांमध्ये विभागणी झाली. या गटबाजीमुळे भाजपची अपेक्षित वाढ झाली नाहीच, उलट वाताहत झाली. काही वर्षांपूर्वीपर्यंत ठराविक चेहरे असलेल्या भाजपची वाटचाल अतिशय संथपणे होती. अंकुश लांडगे यांच्या माध्यमातून भाजपला सर्वप्रथम संजीवनी मिळाली. लांडगे यांच्या काळात पक्षाची जोमाने वाढ झाली, मात्र लांडगे यांचा खून झाल्यानंतर पक्ष पुन्हा पूर्वीच्याच अवस्थेत गेला. तत्कालीन परिस्थितीत एकनाथ पवार, सदाशिव खाडे अशांकडे पक्षाची धुरा आली.

२०१४ मध्ये देशभरात निर्माण झालेल्या ‘मोदी लाटे’चा राजकीय फायदा पिंपरी-चिंचवडला मोठय़ा प्रमाणात झाला. अनेकांनी भाजपचा रस्ता धरला. राष्ट्रवादीचा गड असलेल्या पिंपरी-चिंचवडच्या पट्टय़ात आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे व आझम पानसरे ही राष्ट्रवादीची ताकदीची नेतेमंडळी भाजपमध्ये आली. त्यामुळे स्वप्नातही नसलेली पिंपरी महापालिकेची सत्ता भाजपकडे आली. जगताप, लांडगे यांच्यामुळे भाजपला पुन्हा उभारी मिळाली असली, तरी गटबाजीचे ग्रहण मात्र सुटू शकले नाही. मुंडे-गडकरी गट संपुष्टात आले आणि आता शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप गट, आमदार महेश लांडगे गट, खासदार अमर साबळे गट, पक्षनेते एकनाथ पवार गट, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे गट, अ‍ॅड. सचिन पटवर्धन गट, सारंग कामतेकर गट आणि इतर कोणत्याही गटात नसलेल्या कार्यकर्त्यांचा स्वतंत्र गट, अशी पक्षातील गटवारी झाली आहे.

भाजप नेत्यांमध्ये कमालीची धुसफुस आहे व त्यामागे कार्यकर्त्यांची पूर्वीची भांडणे हे मुख्य कारण आहे. समोर आल्यानंतर हास्यविनोदात रमणारे नेते पाठ वळताच एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण करतात. पक्षाचे पदाधिकारी एकमेकांविषयी शक्य तितके वाईटच बोलतात. भाजप म्हणून िपपरी महापालिकेत सत्ता मिळाली. मात्र, या सत्तेचा लाभ ठराविक चौकडीपुरता मर्यादित असून ही लाभार्थी मंडळी दुसऱ्या पक्षातून आलेली आहेत. त्यांची घरे भरण्यासाठी नागरिकांनी भाजपला सत्ता दिली का, असा भाजप कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे. सत्ता असूनही कोणी समाधानी दिसत नाही. ज्यांनी इतकी वर्षे पक्ष जिवंत ठेवला, त्यांच्या पदरी काहीच नाही. बाहेरून आलेली मंडळी तुपात आणि निष्ठावंतांची उपासमार आहे. गटबाजीचे राजकारण असून कोणीच कोणाला जुमानत नाही. विरोधक शांत आहेत, मात्र स्वपक्षीय कार्यकर्तेच विरोधात जाताना दिसत आहेत. सुरुवातीच्या काळात शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या निषेधाच्या घोषणा भाजप कार्यकर्त्यांनीच दिल्या होत्या, तसेच आमदार महेश लांडगे यांच्या मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. खासदार अमर साबळे यांचा पुतळा पक्ष कार्यालयासमोरच जाळण्यात आला होता. तीनही घटनांमध्ये पक्षांतर्गत नाराजी हा समान धागा होता. सरचिटणीस, संघटन सरचिटणीसपदावरून होती, तशीच खदखद स्वीकृत नगरसेवकपदावरून होती. जुन्या निष्ठावंतांना स्वीकृत नगरसेवक करण्याचा निर्णय झाला असताना, काँग्रेसमधून आलेले बाबू नायर यांची वर्णी लावण्यात आली.

शासकीय पदे कार्यकर्त्यांना मिळेनाशी झाली. महापालिकेत काही कामे होत नाहीत. पक्षाकडून काही द्यायचा विषय आला, की माउली थोरात, सारंग कामतेकर, प्रमोद निसळ अशी मोजकीच नावे पुढे येतात. जुन्यांवर अन्याय होत असल्याचा कांगावा करत स्वत:ला पद मिळवायचे, असा सदाशिव खाडे यांचा डाव आहे, असे कार्यकर्ते सांगतात. पिंपरी प्राधिकरणाच्या अध्यक्षपदासाठी खाडे यांचे नाव निश्चित झाले होते, मात्र भाजप नेत्यांनीच खोडा घातला. त्या पाश्र्वभूमीतूनच खाडे व निसळ यांच्यात वादाची ठिणगी पडली. गोपीनाथ मुंडे हयात असताना खाडे यांची पिंपरीच्या शहराध्यक्षपदावर निवड झाली होती.

वॉर्डात निवडून येण्याची क्षमता नसल्यामुळेच ते निवडणूक लढवण्याच्या भानगडीत पडले नाहीत. प्रमोद निसळ हे फटकळ व्यक्तिमत्त्व म्हणून शहर भाजपमध्ये प्रसिद्ध आहेत. पक्षनेते एकनाथ पवार यांचे खंदे समर्थक असलेल्या निसळ यांना आता शहराध्यक्ष जगतापांकडून भक्कम पाठबळ मिळू लागले आहे. खाडे व निसळ यांच्यात वाद झाल्यानंतर भाजपमधील गटबाजीचे राजकारण पुन्हा तापू लागले आहे. लक्ष्मण जगताप, एकनाथ पवार, कामतेकर यांच्या विरोधकांनी उचल खाल्ली आहे. त्यांच्या विरोधी गटांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. सत्ता नसलेली बरी, अशी भावना भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे. यातून निर्माण होणारी परिस्थिती आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपला निश्चितपणे मारक ठरणार आहे.