गणेशोत्सवादरम्यान जास्तीत जास्त पन्नास मीटर अंतरापर्यंत रनिंग मंडप घालण्याची परवानगी मंडळांना देण्यात येणार आहे. तसेच मंडपाची उंची ४० फुटांपेक्षा जास्त ठेवता येणार नाही. अनधिकृत जाहिराती करण्यासही मंडळांना मज्जाव करण्यात आला आहे. परवानाधारक मंडळांना मंडप, स्टेज, कमानी आणि रनिंग मंडपाची झालर यावर जाहिराती लावण्यासाठी महापालिकेच्या परवाना आणि आकाशचिन्ह विभागाची अधिकृत परवानगी घ्यावी लागणार आहे.

यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. त्या पार्श्वबूमीवर गणेशोत्सवाच्या अटी आणि शर्थी स्पष्ट करणारी नियमावली महापालिकेकडून तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये या बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.यंदा सर्व मंडळांना परवानाशुल्क माफ करण्यात आले आहे. मात्र अन्य बाबींसाठी आकाशचिन्ह आणि परवाना विभागाची मान्यता घ्यावी लागणार आहे. तसेच वाहतूक पोलीस आणि पोलिसांच्या ना हरकत प्रमाणपत्रही बंधनकारक करण्यात आले आहे.

मुख्य मांडवापासून दोन्ही बाजूल ५० मीटर अंतरापर्यंत अधिकृत जाहिराती लावता येणार आहे. एकापेक्षा अधिक मंडळे असल्यास त्यांना समप्रमाणात जागा विभागून दिली जाणार आहे. परवानगी घेऊनच जाहिराती लावता येणार आहेत. अनधिकृत जाहिराती लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, जाहिरात करताना एक पंचमांश भागात महापालिकेच्या उपक्रमांची माहिती देणे मंडळांना बंधनकारक करण्यात आले आहे.

स्वागत कमानींची उंची १८ फुटांपेक्षा जास्त असावी, मांडवाची उंची ४० फुटांपक्षा जास्त नसावी, त्याहून अधिक मांडव टाकायचा झाल्यास त्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. अधिकृत परवान्यांची प्रत मांडवाच्या दर्शनी भागात लावण्याची सूचना नियमावलीमध्ये करण्यात आली आहे. परवान्याची मुदत संपल्यानंतर मंडळांनी तीन दिवसांच्या आता मंडप, देखाव्याचे बांधकाम, अन्य साहित्य, रनिंग मंडप, विसर्जन मिरवणुकीसाठी वापरलेली वाहने तातडीने हटवावीवत तसेच मंडप उभारताना झालेले खड्डे तातडीने बुजवावेत आणि रस्ते पूर्ववत करावेत, असे या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.