पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही पक्षांकडून वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी (१० जून) रोजी पुण्यात शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा मेळावा हा बालगंधर्व रंगमंदिरात, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा मेळावा बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे. या मेळाव्यांमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संंस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपापल्या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काय सूचना देणार, याकडे लक्ष असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बालगंधर्व रंगमंदिर येथे मेळावा होणार आहे. आज, सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे ध्वजारोहण झाल्यानंतर सकाळी साडेदहा ते दोन यावेळेत बालगंधर्व रंगमंदिर येथे मेळावा होणार आहे. या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा मेळावा हा बालेवाडी येथे होणार असून, त्यासाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात जय्यत तयारी करण्यात आली आहे. यानिमित्ताने पक्षाचे प्रमुख नेते शहरात तळ ठोकून आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांंच्या हस्ते सकाळी दहा वाजून १० मिनिटांनी ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता मेळावा होणार आहे. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे मार्गदर्शन करणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने तयारी करण्याबाबत या मेळाव्यांमध्ये नेत्यांकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना दिल्या जाणार आहेत. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा माजी तालुक्याध्यक्ष आहे. याशिवाय या पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे. या पार्श्वभूमीवर मेळाव्यामध्ये पक्षाची भूमिका मांडणारा जाहीरनामा; तसेच पक्षाचा कोणताही कार्यकर्ता हा विकृत मनोवृत्तीचा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा असता कामा नये, यावर चर्चा करून याबाबतचा ठराव मांडला जाणार आहे.