लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आणि राष्ट्रीय बतमीपत्र आता ‘विविध भारती एफएम’वरूनही प्रसारित केले जाणार असून शनिवारपासून त्याची कार्यवाही सुरू झाली. अनेक वर्षांची ही मागणी पूर्णत्वास गेली असून श्रोत्यांना आता मोबाईलवरील एफएमवर बातम्या ऐकण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

आकाशवाणी पुणे केंद्रावरून दररोज सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी प्रादेशिक बातम्यांचे प्रसारण केले जाते. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता दहा मिनिटे कालावधीचे राष्ट्रीय बातमीपत्र प्रक्षेपित केले जाते. या दोन्ही बातम्या ऐकणाऱ्या श्रोत्यांची संख्या मोठी आहे. सध्या ‘मीडिअम व्हेव्ह रेडिओ’ उपलब्ध होत नाहीत. त्याचप्रमाणे घरातील रेडिओवर खरखर येत असल्याने बातम्या सुस्पष्टपणे ऐकायला येत नाहीत, अशी श्रोत्यांची तक्रार होती. या पार्श्वभूमीवर पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या विविध भारती एफएमवर प्रसारित कराव्यात, अशी मागणी सातत्याने होत होती. त्याची दखल घेण्याचे आश्वासन माहिती प्रसारणमंत्री असताना प्रकाश जावडेकर यांनी दिले होते. मात्र, त्याची पूर्तता आता होत असल्याने श्रोत्यांना विविध भारती एफएमवर बातम्या आपल्या मोबाईलवर ऐकणे शक्य झाले आहे.

आणखी वाचा- हॉटेल व्यावसायिकांनी घनकचरा व्यवस्थापन करावे; आयुक्त शेखर सिंह यांचे आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आकाशवाणी संचालनालयाचे महासंचालक यांच्याकडून आलेल्या निर्देशानुसार आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आणि राष्ट्रीय बातमीपत्र आता विविध भारती एफएमवर ऐकायला मिळणार असून त्याची कार्यवाही शनिवारपासून करण्यात आली आहे, अशी माहिती आकाशवाणी पुणे केंद्राचे सहायक केंद्र संचालक इंद्रजित बागल यांनी दिली.