लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: नगर रस्त्यावरील वाघोलीतील तलाठी कार्यालयात कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांकडून लाच मागणाऱ्या दोन दलालांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. दलालांनी तलाठ्यांना पैसे द्यावे लागतात, असे सांगून ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.

या प्रकरणी भाऊसाहेब भिकाजी गिरी (वय ५६, रा. साई बालाजी सोसायटी, आव्हाळवाडी, वाघोली, नगर रस्ता), संजय मारुती लगड (वय ५३, रा. लोहगाव) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराने पत्नीच्या नावे वाघोली परिसरात जमीन खरेदी केली होती. खरेदी केलेल्या जमिनीची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी तलाठी कार्यालयात वावरणारे दलाल भाऊसाहेब गिरी आणि संजय लगड यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. तलाठी पटांगे यांना ४५ हजार रुपये द्यावे लागतील, असे तक्रारदाराला सांगितले होते.

आणखी वाचा-पुणे: जमिनीच्या वादातून हाणामारी; तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार

त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. सापळा लावून गिरी, लगड यांना पकडले. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक श्रीहरी पाटील आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brokers were caught at the talathi office in wagholi pune print news rbk 25 mrj
First published on: 07-06-2023 at 14:08 IST