पिंपरी- चिंचवड: सतत होणारे वाद आणि बहिणीला माहेरी येऊ न देणाऱ्या भाऊजीची अत्यंत क्रूरपणे कोयत्याने सपासप वार करून हत्या केल्याची घटना चिंचवडमध्ये घडली आहे. वैभव भागवत थोरात असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी योगेश अनंत गायकवाड (मेहुणा), अनिल आनंद बनसोडे, महेश आप्पालाल कोळीसह सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश अनंत गायकवाडची बहीण हत्या झालेला वैभव भागवत थोरातची पत्नी आहे. आरोपी योगेशसह इतर आरोपींसोबत अनेकदा वैभवचे वाद झाले होते. याचा राग आरोपींच्या मनात होता. तसेच योगेशच्या बहिणीला वैभव माहेरी येऊ देत नव्हता. हा देखील राग योगेशच्या मनात होता.

आज दुपारी वैभव थोरात नागसेन झोपडपट्टी येथील पत्राशेडमध्ये काही जणांसोबत बसला होता. तेव्हा यातील आरोपींनी अचानक येऊन त्याच्यावर हल्ला केला. अत्यंत क्रूरपणे दोन्ही हातावर, छातीवर, डोक्यात कोयत्याने सपासप वार करण्यात आले. यात गंभीर जखमी होऊन वैभवचा जागीच मृत्यू झाला.

वैभव रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. कोयत्याने अत्यंत क्रूरपणे वार करण्यात आले. वैभवचा उजवा हात कोपऱ्यापासून वेगळा झाला आहे. डाव्या हातावरही अनेक वार करण्यात आलेत. घटनेनंतर तात्काळ चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या काही तासात आरोपींना अटक करण्यात आली.

“चिंचवडमध्ये पूर्ववैमनस्यातून वैभव थोरात याची मेहुण्याने काही जणांसोबत घेऊन हत्या केली. घटनेनंतर आरोपींना काही तासात अटक करण्यात आली आहे. ही घटना साडेतीनच्या सुमारास घडली.” – अंकुश बांगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक