पिंपरी-चिंचवड : वडमुखवाडी येथील एका शेतकऱ्याच्या सुमारे ५०० किलो वजनाच्या बैलाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. आज सायंकाळी ५:३० वाजता तापकीर नगर, वडमुखवाडी परिसरात हा बैल विहिरीत पडल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली.

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि खऱ्या अर्थाने सोबती असलेला बैल खोल विहिरीत पडल्याने मोठा आवाज करत होता व बाहेर पडण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. बैल थकून बुडण्याची शक्यता लक्षात घेऊन, अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कोणतीही वेळ न दवडता, सुरक्षेची साधने (सेफ्टी साधन) वापरून तीन ग्रामस्थांना विहिरीत उतरवले. या जवानांनी आणि ग्रामस्थांनी मिळून बैलाला बुडू न देण्यासाठी तत्काळ त्याच्या शरीराला दोन बेल्ट्स आणि मजबूत दोरखंड (रोप) बांधले आणि क्रेन येईपर्यंत त्याला पाण्याच्या पृष्ठभागावर आधार दिला.

तब्बल अर्ध्या तासाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर, क्रेनच्या साहाय्याने या बैलाला सुरक्षितपणे वर काढण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान विशाल पोटे, लक्ष्मण ओव्हाळे, सचिन ठोसरे, ऋषिकेश रांजणे, शुभम बोराडे, संस्कार चव्हाण, आणि अमोल रांजणे यांनी केलेल्या या प्रशंसनीय कामगिरीबद्दल शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले.