गणेश यादव

पिंपरी : बसची आसन क्षमता ३९ असताना तब्बल ८० प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसवर पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) वायुवेग पथकाने कारवाई केली. वाहनाची नोंदणी निलंबित, योग्यता प्रमाणपत्र रद्द, वाहनाचा परवाना (परमीट) निलंबित करण्यात येणार आहे.

दरम्यान, जानेवारी ते सप्टेंबर २०२३ दरम्यान दोन हजार ६२२ बसची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १ हजार ३ वाहनचालकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून १ कोटी ८ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

आणखी वाचा-अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलचा श्रीलंकेला पळून जाण्याचा डाव ‘असा’ फसला…

बस क्रमांक यूपी ३१, टी ९२१७ वर आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. या वाहनाची आसन क्षमता २४ सिट्‌स आणि १५ बर्थ अशी एकूण ३९ प्रवासी एवढी आहे. परंतु, या वाहनातून ८० प्रवाशांची वाहतूक करताना आढळून आले. वाहनाची तपासणी करण्यात आली. प्रथम उपचार पेटी, अग्निशामक यंत्रणा तसेच आपत्कालीन यंत्रणा नसल्याचे आढळून आले. वाहनाच्या खिडकीचे काच तुटलेले होते. टपावरुन मालाची वाहतूक केली जात होती. हे वाहन पाच टन भार जास्त (ओव्हरलोड) असल्याचे पाहणीत निष्पन्न झाले.

आणखी वाचा-धक्कादायक! ससून रुग्णालयात बेकायदा वसुलीचा वाहन‘तळ’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहन चालकाची अनुज्ञप्ती निलंबित करणे, वाहनाची नोंदणी निलंबित करणे, वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र रद्द करणे व वाहनाचा परवाना (परमीट) निलंबित केले जाणार आहे. एखाद्या वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जात असल्यास mh14prosecution@gmail.com या ई-मेल आयडी वर तक्रार करावी. तसेच अशा वाहनातून प्रवास करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने टाळावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे. ही कारवाई वायुवेग पथकातील मोटार वाहन निरीक्षक प्रकाश मुळे, सहायक मोटार वाहन निरीक्षक रवींद्र गावडे, गीतांजली काळे यांनी केली.