सदनिकेत शिरलेल्या चोरट्यांनी पत्नीला चाकुचा धाक दाखवून ३९ तोळ्याचे दागिने, रोकड असा २१ लाख २५ हजारांचा ऐवज लुटल्याची तक्रार देणाऱ्या व्यावसायिकाने लुटीचा बनाव केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. कर्जबाजारी झाल्याने व्यावसायिकाने पोलिसांकडे खोटी तक्रार दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सोमवार पेठेतील १५ ऑगस्ट चौकात एका सोसायटीत व्यावसायिक राहायला आहे. त्याने घरात शिरलेल्या चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून दागिने तसेच रोकड लुटल्याची फिर्याद समर्थ पोलीस ठाण्यात दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने तपास सुरू केला होता. तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. श्वान पथक तसेच अंगुली मुद्रा तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी आले होते. सीसीटीव्ही चित्रीकरणात चोरट्यांचा वावर आढळून आला नव्हता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी व्यावसायिकाची चौकशी केली. तेव्हा व्यावसायिकाने ४२ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे पोलिसांना सांगितले. देणेकऱ्यांचा तगादा सुरू होता. पैसे देण्यास थोडा कालावधी वाढवून मिळावा म्हणून लुटीचा बनाव केल्याची कबुली व्यावसायिकाने पोलिसांना दिली. व्यावसायिकाने दागिने आणि रोकड घरात लपवून ठेवल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला.