घरोघरी जाऊन गरोदर स्त्रियांच्या आरोग्याची नोंद ठेवणाऱ्या आरोग्य कर्मचारी आता या नोंदी टिपून घेण्यासाठी चक्क स्मार्टफोनचा वापर करताना पाहायला मिळणार आहेत. गरोदरपणातील धोके लवकर लक्षात यावेत आणि पुढील गुंतागुंत टाळता याव्यात यासाठी ‘सायन्स फॉर सोसायटी’ या संस्थेने ‘केअर मदर’ किट बनवले आहे. आरोग्य कर्मचारी हे किट वापरून गरोदर महिलेच्या घरी जाऊन तिच्या चाचण्या करू शकतात, तसेच चाचण्यांच्या नोंदी स्मार्टफोनवरील अॅप्लिकेशनद्वारे थेट डॉक्टरांपर्यंत पोहोचवू शकतात.
फेब्रुवारीपासून पुण्यात तळेगावजवळील ५ ते १० खेडय़ांमध्ये हे किट प्रायोगिक तत्त्वावर वापरले जाणार आहे. एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय (तळेगाव) येथील स्त्रीरोग विभागामार्फत हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, तो एक वर्ष सुरू राहणार असल्याची माहिती सहयोगी प्राध्यापक डॉ. वैशाली कोरडे यांनी दिली.
या किटमध्ये गरोदर स्त्रियांच्या आठ वेगवेगळय़ा चाचण्या करता येतात. चाचण्यांचे अहवाल स्मार्टफोनवरील अॅप्लिकेशनमध्ये लोड केल्यानंतर ते डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील दुवा म्हणून काम करते. ज्या स्त्रीला गरोदरपणात धोका आहे तिची माहिती डॉक्टरांच्या लगेच लक्षात येईल अशा पद्धतीने दाखवली जाते. या महिलांना एसएमएसद्वारे आरोग्याविषयीचे ‘अलर्ट्स’ पाठवण्याची सोयही या अॅप्लिकेशनमध्ये आहे. तसेच गरोदरपणात घेण्याच्या काळजीसंबंधीची सोपी माहिती मराठीत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
स्मार्टफोनमध्ये माहिती अपलोड करण्याचे काम आरोग्य कर्मचारी सहज करत असल्याचा अनुभव सायन्स फॉर सोसायटीचे शंतनू पाठक यांनी सांगितला. ते म्हणाले, ‘‘किटमधील ८ चाचण्या करण्यासाठी प्रत्येक स्त्रीला प्रत्येक वेळी कमीतकमी ४०० रुपये खर्च येणे अपेक्षित आहे. मात्र किटचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला गेल्यास हा खर्च शंभर रुपयांवर आणता येतो. ज्या महिलांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका असतो त्यांना गरोदरपणाच्या २०व्या आठवडय़ापासून ३७व्या आठवडय़ापर्यंत रक्तातील साखर, रक्तदाब आणि लघवी तपासणी वारंवार करण्यास सांगितली जाते. अशा स्त्रियांना हे किट भाडेतत्त्वावर घेऊन घरच्या घरीदेखील वापरता येऊ शकेल.’’
‘केअर मदर’द्वारे या तपासण्या करता येतात :
– हिमोग्लोबिन
– रक्तदाब
– रक्तातील साखर
– लघवी तपासणी
– गर्भाच्या वाढीदरम्यान गर्भाशयाच्या आकाराचे मोजमाप (फंडल हाईट)
– गर्भाच्या हृदयाचे ठोके (फीटल हार्ट रेट)
– मातेचे वजन व उंची, वजन व उंचीचे गुणोत्तर (बॉडी मास इंडेक्स)