पुणे : विसर्जन सोहळ्यात वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराशी अश्लील वर्तन करून तिच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी एका ढोल ताशा पथकातील वादकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बेलबाग चौकात ही घटना घडली. याबाबत एका महिला पत्रकाराने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी त्रिताल या ढोल ताशा पथकातील दोन वादकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५ (१), ३५२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला पत्रकार विसर्जन सोहळ्यात शनिवारी (६ सप्टेंबर) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास वार्तांकन करत होती. त्या वेळी त्रिताल ढोल ताशा पथकातील एका वादकाने लोखंडी ट्राॅली ओढत आणली. पायावरुन चाक गेल्याने महिला पत्रकाराने त्याच्याकडे विचारणा केली.
तेव्हा वादकाने महिला पत्रकाराशी वाद घालून धक्काबुक्की केली. तिच्याबरोबर अश्लील वर्तन केले. महिला पत्रकाराबरोबर असलेल्या सहकाऱ्याने वादकाला जाब विचारला. तेव्हा वादक आणि त्याच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्याने त्याला धक्काबुक्की केली. मारहाणीत त्याचा चष्मा तुटला. ढोल पथकातील वादकांनी दोघांना शिवीगाळ केली. त्यानंतर महिला पत्रकाराने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. या प्रकरणी ढोल ताशा पथकातील दोन वादकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील तपास करत आहेत.
या प्रकरणी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना सोमवारी निवेदन दिले. पत्रकार संघाकडून या प्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली.