Pune Viral Video Crime news : पुण्यात एका मद्यधुंद तरूणाने बीएमडब्लू गाडी रस्त्याच्या मधोमध थांबवून रस्त्यातच लघुशंका केल्याचा प्रकार समोर आला आहे. स्थानिकांनी जेव्हा या युवकाला हटकले, तेव्हा युवकाने अश्लील हावभाव करून दाखवले. दरम्यान स्थानिकांनी काढलेला या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर आता या प्रकराची पोलिसांनी देखील गंभीर दखल घेतली आहे. या तरुणांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी या आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना झाल्याचे माहिती दिली आहे.

या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना याबद्दल माहिती झाली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित व्यक्तीचे नाव निष्पन्न करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त जाधव यांनी दिली आहे.

आरोपींचा शोध सुरू

आरोपीचं नाव काय आहे? गाडी कोणाची होती? याबद्दल बोलताना उपायुक्त म्हणाले की, त्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली आहे. पण आरोपीला पकडण्यात अडथळा येऊ शकतो त्यामुळे मी त्यांची नावे उघड करत नाही. कारवाई पूर्ण झाल्यावर आणि आरोपी ताब्यात आल्यानंतर याबद्दलची माहिती उघड केली जाईल असेही त्यांनी सांगितले. व्यक्तीचे घर, त्यांचे काही नातेवाईक, पुण्याच्या बाहेरील त्यांची काही मित्रमंडळी यांच्याकडे त्यांचा शोध घेतला जात आहे. मुलांनी कुठे पार्टी केली होती का याबद्दल माहिती मिळाली नाही, पण तपास केला जात आहे असेही पोलीस उपायुक्त म्हणाले.

आरोपी मुलांच्या आई-वडीलांशी संपर्क झाला असून आरोपींना ताब्यात घेण्यासाठी टीम रवाना झाल्याचे देखील त्यांनी सांगितले. दरम्यान पुण्यातील घटनेतील आरोपी अल्पवयीन आहेत का? याबद्दल माहिती देताना हिंमत जाधव यांनी सांगितलं की, आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हे अल्पवयीन नाहीत. त्यांचे लोकेशन ट्रेस झाले नसले तरी शंका असलेल्या ठिकाणी त्यांचा शोध घेतला जात आहे.

आरोपी सापडले का नाहीत?

आरोपींपर्यंत अद्याप पोलीस का पोहचू शकलेले नाहीत? या घटनेत राजकीय दबाव आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना पोलीस उपायुक्तांनी सांगितलं की, “असा कोणताही प्रकार नाही. सकाळी साधारणतः साडेदहा-अकरा वाजता ही घटना प्रसार माध्यमांमधूनच आम्हाला समजली आहे. जशी आम्हाला समजली तशी आरोपी आणि त्यांच्या नातेवाईकांना देखील समजली असू शकते. त्यामुळे आरोपी आद्यापपर्यंत सापडले नाहीत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपींविरोधात कोणती कलमे लावणार?

या प्रकरणात गाडीचा चालक आणि व्हिडीओमध्ये दिसत आहेत. त्यांच्यावर गु्न्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण करणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लील व अश्लाघ्य वर्तन करणे, मोटार व्हेकल कायद्याप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी रहदारीला अडथळा निर्माण करणे या कमलांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जात आहे असे पोलीस उपायुक्त म्हणाले. संबंधितांची ओळख पटली असून पोलीस पथके त्यांचा शोध घेत आहेत, लवकरच आपण त्यांना ताब्यात घेऊ असेही पोलीस उपायुक्तांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.