लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: विनापरवाना आठ झाडे तोडणाऱ्या कंपनी मालकासह ठेकेदाराविरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाकडे घेऊन जाणारा ट्रकही महापालिकेने ताब्यात घेतला. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली.

सुरेश जे बजाज, राजेंद्र बाबू मांजरे (रा.बौद्धनगर, निगडी) यांच्याविरोधात महाराष्ट्र झाडे तोडणे, झाडांचे संरक्षण व जतन या अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महापालिकेचे उद्यान सहाय्यक सुहास एकनाथ सामसे (वय ४७, रा.उद्यमनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.

हेही वाचा… पुणे: मासेमारीची नाव विकून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी गजाआड

भोसरी एमआयडीसी येथील एफ -दोन ब्लॉकमध्ये विनापरवाना झाडे तोडले जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उद्यान विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. कंपनीतील आणि फुटपाथवरील महापालिका मालकीची आठ झाडे तोडल्याचे निदर्शनास आले. त्यात मोहोगणीची चार, कांचन, कोशिया, रेन्ट्री आणि आंब्याचे प्रत्येकी एक झाड जमिनीपासून तोडले. ती लाकडे टेम्पोमध्ये भरली होती. कंपनी मालक बजाज यांनी झाडे तोडण्यासाठी परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. ठेकेदार मांजरे याने कंपनी मालक बजाज यांनी बेकायदेशीररित्या झाडे तोडण्यास सांगितल्याची कबुली दिली. त्यानुसार या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रस्त्यावरील पाच आणि कंपनीतील तीन अशी आठ झाडे विनापरवाना तोडली आहेत. अडथळा ठरत असल्याने झाडे तोडल्याचे कंपनी मालक, ठेकेदाराने सांगितले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लाकडे घेवून जाणारा टेम्पो ताब्यात घेतला आहे. – रविकिरण घोडके, उद्यान विभागप्रमुख, पिंपरी-चिंचवड महापालिका