पुणे : घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी अडीच लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना हडपसर भागात नुकतीच घडली. याबाबत एकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे हडपसर भागातील गोंधळेनगर भागात बैठे घर आहे. चोरट्यांनी मध्यरात्री घराचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्याने ५० हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा दोन लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. पोलीस कर्मचारी सूर्यवंशी तपास करत आहेत.

केशकर्तनालयातून दीड लाखाची रोकड लंपास

लोहगाव भागातील एका केशकर्तनालयाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील दीड लाखाची रोकड चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराचे लोहगाव भागात केशकर्तनालय आहे. त्यांनी कामानिमित्त बँकेतून दीड लाखाची रोकड काढली होती. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. रोकड चोरून चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोदामातून लोखंडी शिड्या चोरीला

नगर रस्त्यावरील केसनंद भागात असलेल्या गोदामातून चोरट्यांनी १७२ लोखंडी शिड्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराचे केसनंद परिसरात जय बाबा वेअर हाऊस हे गोदाम आहे. चोरट्यांनी गोदामाचे कुलूप तोडले. गोदामात ठेवलेल्या १७२ लोखंडी शिड्या टेम्पोत ठेवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक बागल तपास करत आहेत.