पुणे : धनकवडीत पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पसार झालेल्या दुचाकीस्वार चोरट्याला सहकारनगर पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर बारा तासांच्या आत अटक केली. चोरट्याकडून मंगळसूत्र, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अमोल किसन नाकते (वय २७, सध्या रा. समता काॅलनी, आंबेगाव पठार, धनकवडी, मूळ रा. पिंपरी, गुंजवणे,ता. वेल्हा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत ज्येष्ठ महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार ज्येष्ठ महिला १६ मे रोजी सकाळी नेहमीप्रमाणे बाहेर फिरायला पडल्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरटा नाकते याने त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. या घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी धनकवडी परिसरातील १५० ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले.
आरोपी आंबेगाव पठार परिसरात थांबल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसंच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून मंगळसूत्र आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली.
परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, गुन्हे शाखेच्या निरीक्षक सुरेखा चव्हाण, सहायक निरीक्षक सागर पाटील, बापू खुटवड, सागर सुतकर, योगेश ढोले, प्रदीप रेणुसे, महेश भगत, बजरंग पवार, आकाश कीर्तीकर, खंडू शिंदे, अमित पदमाळे यांनी ही कामगिरी केली.