पुणे : देशभरात करोना संसर्गामध्ये वाढ होत असून, महाराष्ट्रातही रुग्णसंख्येतील वाढ कायम आहे. करोना संसर्गातील वाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांच्या कार्यवाहीचे पाऊल राज्याच्या आरोग्य विभागाने उचलले असून, वृद्ध, सहव्याधीग्रस्त आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टी (मास्क) वापरावी, असे आवाहन केले आहे. याचबरोबर आरोग्य यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासही सुरुवात केली आहे.

राज्याचे आरोग्य सचिव निपुण विनायक आणि वीरेंद्र सिंह यांनी याबाबतचे पत्र सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सोमवारी पाठविले. ‘देशाच्या काही भागांत करोना संसर्गामध्ये वाढ दिसून येत आहे. बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. ओमिक्रॉनचे उपप्रकार जेन-१, एक्सएफजी आणि एलएफ ७.९ हे रुग्णसंख्या वाढीस कारणीभूत ठरत आहेत. रुग्णांमध्ये ताप, खोकला आणि घसा खवखवणे यासारखी लक्षणे दिसून येत आहेत. देशातील सक्रिय करोना रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण सहा राज्यांत आहेत. त्यात केरळ, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तमिळनाडू आणि कर्नाटकचा समावेश आहे. राज्यात सध्या ५०६ सक्रिय रुग्ण असून, मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची कार्यवाही करण्यात येणार आहे,’ असे या पत्रात म्हटले आहे.

जिल्हा, उपजिल्हा पातळीवर तसेच वैद्यकीय महाविद्यालये, तृतीय सेवा संस्था, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये आणि इतर सर्व आंतररुग्ण सेवांतील रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. रोगनिदान, आवश्यक औषधे, पीपीई कीट, विलगीकरण रुग्णशय्या, वैद्यकीय ऑक्सिजन, अतिदक्षता विभाग आणि व्हेंटिलेटर रुग्णशय्या यांची पुरेशी उपलब्धता ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. कृत्रिम ऑक्सिजन प्रकल्पांची सज्जता तपासण्यासाठी प्रात्यक्षिके घेण्यासही सांगण्यात आले आहे. याबाबतचा अहवाल सर्व वैद्यकीय सेवांना तातडीने आरोग्य विभागाला सादर करावा लागणार आहे.

सरकारच्या सूचना

– सर्व श्वसन रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवणे.

– श्वसन रुग्णांचे सर्वेक्षण करणे.

– श्वसन रुग्णांपैकी ५ टक्के नमुने तपासणीसाठी पाठविणे.

– पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविणे.

– व्यक्तिगत स्वच्छतेबाबत जनजागृती मोहीम राबविणे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– वृद्ध, सहव्याधीग्रस्त आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टी (मास्क) वापरावी.