राज्यातील अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची सामाईक प्रवेश परीक्षेचे (सीईटी) अर्ज १ मार्चपासून उपलब्ध होणार असून परीक्षेचे नियमही यावेळी कडक करण्यात आल्याचे दिसत आहे.
राज्यात अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माण आदी शाखांची प्रवेश प्रक्रिया सामाईक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ही परीक्षा ५ मे रोजी होणार आहे. परीक्षेचे ऑनलाईन अर्ज १ मार्चपासून उपलब्ध होणार आहेत. गेली दोन वर्षे ही प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय परीक्षांच्या माध्यमातून घेण्यात येत होती. मात्र या वर्षीपासून राज्याच्या सीईटीच्या माध्यमातूनच प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. बारावीच्या अभ्यासक्रमावर ही परीक्षा असणार आहे. त्याचप्रमाणे प्रवेश प्रक्रिया फक्त प्रवेश परीक्षेच्या माध्यमातूनच करण्यात येणार आहे हे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षेसाठी नकारात्मक गुणांकन करण्यात येणार नाही.
परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षेचे निकषही कडक करण्यात आले आहेत. परीक्षेपूर्वी ४५ मिनिटे परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. परीक्षेचा वेळ पूर्ण होईपर्यंत परीक्षेच्या खोलीतून बाहेर पडण्यासाठी विद्यार्थ्यांना मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे केंद्रावर घडय़ाळ नेण्यासही बंदी घालण्यात आली आहे.