पुणे : पदवी आणि पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशांच्या तीन फेऱ्या झाल्यानंतर उर्वरित रिक्‍त जागा संस्थांस्तरावर भरल्या जातात. मात्र संस्थावरील प्रवेश प्रक्रिया नियमानुसार आणि गुणवत्तेनुसार राबवण्याबाबत स्पष्ट करतानाच नियम डावलून प्रवेश प्रक्रिया राबवणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्याचा इशारा राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) दिला. त्यामुळे संस्थास्तरावर प्रवेश प्रक्रियेवर सीईटी सेलकडून लक्ष दिले जाणार असल्याचे दिसून येत आहे.

राज्य सीईटी सेलअंतर्गत तंत्रशिक्षण विभागातील विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियेसाठी सध्या नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरल्यानंतर कागदपत्र पडताळणी करून तीन नियमित प्रवेश फेऱ्या होतील. या फेऱ्यांचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे. प्रवेशाची सर्व फेऱ्या संपल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागा संस्थांना त्यांच्या स्तरावर भरण्याची मुभा असते. मात्र संस्थांस्तरावरील जागा भरताना नियम डावलून प्रवेश दिले जात असल्याच्या तक्रारी पालक-संघटनांकडून केल्या जातात. त्यामुळे संस्थास्तरावरील प्रवेशांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते. या पार्श्‍वभूमीवर राज्य सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभूवन यांनी परिपत्रक प्रसिद्ध करून संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना दिल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संस्थास्तरावरील जागांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातच्या माहिती पुस्तिकामध्ये सर्व नियम नमूद केलेले आहेत. या नियमांचे तंतोतंत पालन करून संस्थांनी प्रवेश प्रक्रिया राबविणे आवश्‍यक आहे. रिक्‍त जागा भरताना विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जाची यादी, त्यांची अंतिम गुणवत्ता यादी संस्थेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिध्द करावी, ती यादी सीईटी सेलच्या माहितीसाठी ई-मेलद्वारे पाठवण्याबाबतही स्पष्ट करण्यात आले आहे.