पुणे : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) विविध प्रवेश परीक्षा मंगळवारपासून सुरू झाल्या. मात्र सर्व्हर नेटवर्किंगसारख्या तांत्रिक अडचणींमुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान अडचणींना तोंड द्यावे लागले. तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा न झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली. सीईटी सेलने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या १५ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा मंगळवारपासून सुरू झाल्या. त्यात बीएड.-एमएड तीन वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम, पाच वर्षं विधी अभ्यासक्रम, बीपीएड, वास्तुकला पदव्युत्तर पदवी, एमएचएमसीटी, एम.एड या परीक्षांचा समावेश होता. सकाळ आणि दुपारच्या सत्रातील परीक्षा मिळून ४१ ते ७५ टक्के उपस्थिती होती. सीईटी सेलने दिलेल्या माहितीनुसार सकाळ आणि दुुपारच्या सत्रात तांत्रिक आणि सर्व्हर नेटवर्किंग बिघाडामुळे काही विद्यार्थ्यांची परीक्षा खंडित आणि विलंबित झाली. त्यामुळे काही केंद्रावर परीक्षा विलंबाने पूर्ण झाली. काही केंद्रात तांत्रिक बिघाडामुळे काही विद्यार्थ्यांना लॉग इन करता आले नाही. ज्या विद्यार्थ्यांचे तांत्रिक कारणामुळे, नेटवर्किंग बिघाडामुळे लॉग इन होऊ शकले नाही किंवा परीक्षा पूर्ण झाली नाही त्या विद्यार्थ्यांचे सर्व्हरवरील लॉग इन पडताळून फेरपरीक्षेचे नियोजन केले जाईल. त्याबाबत विद्यार्थ्यांना कळवण्यात येईल.