राज्याच्या बहुतांश भागात सध्या पावसाची विश्रांती असली, तरी प्रामुख्याने मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात हलक्या पावसाचा अंदाज आहे. कोकण विभागासह मराठवाडा आणि विदर्भातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

पूवरेत्तर अरबी समुद्र आणि कच्छच्या आसपासच्या भागात कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्यामुळे उष्ण वारे गुजरातच्या दिशेने जात आहेत. गुजरातमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या स्थितीचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावरही होणार आहे. ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३० सप्टेंबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आदी जिल्ह्यांत काही ठिकाणी मेघगर्जना आणि हलक्या पावसाचा अंदाज आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक आदी ठिकाणीही हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई आणि पुणे शहर परिसरात रात्री ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या एक-दोन सरींचा अंदाज आहे. गेल्या चोवीस तासांत विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. इतरत्र काही ठिकाणी हलका पाऊस झाला.