विलक्षण कथांतून मराठी साहित्यविश्वात वेगळीच प्रतिमासृष्टी निर्माण करणारे साहित्यिक जी. ए. कुलकर्णी यांचा आवाज ऐकण्याची संधी जीएप्रेमी आणि साहित्यप्रेमींना मिळणार आहे. जीएंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ९ ऑक्टोबरला पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, जीएंच्या आवाजातील कथा, मुग्धा-मनीषा या त्यांच्या भाच्यांशी साधलेल्या संवाद श्राव्य स्वरुपात अनुभवता येणार आहे. जीएंच्या भगिनी नंदा पैठणकर यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी, अक्षरधारा बुक गॅलरीच्या रसिका राठिवडेकर, स्टोरीटेलचे योगेश दशरथ, प्रसाद मिरासदार आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>> पुणे : किराणा व्यापाऱ्याची २४ लाखांची फसवणूक ; चौघांविरूद्ध गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जीएंचे जन्मशताब्दी वर्ष विविध उपक्रमांनी साजरे करण्यात येत आहे. ९ ऑक्टोबरला सायंकाळी पाच ते आठ या वेळेत होणाऱ्या कार्यक्रमाला ज्येष्ठ लेखिका डॉ. वीणा देव उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमात जीएंचे विद्यार्थी चंद्रशेखर चिकमठ जीएंच्या आठवणींना उजाळा देतील. हैदराबाद येथील भावतरंग संस्थेतर्फे जीएंच्या पराभव या कथेवर आधारित विजय नाईक यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या एकांकिकेचे सादरीकरण करण्यात येणार आहे. एकांकिकेत आश्लेषा शिंत्रे, अविनाश रानडे, प्रकाश तुळतापूरकर, मेघना चाफळकर, श्रीराम शिंत्रे यांचा सहभाग आहे. जन्मशताब्दी वर्षाचा योग साधून जीएंच्या आवाजातील कथा, संवाद पहिल्यांदाच त्यांच्या चाहत्यांना, साहित्यप्रेमींना ऐकता येईल. काही गोष्टी, काही गप्पा या नावाने विशेष भाग स्टोरीटेलवर उपलब्ध होईल, असे पैठणकर यांनी सांगितले.