पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका चंचला कोद्रे यांची गुरुवारी निवड झाली. त्यांनी भाजप-शिवसेना युतीच्या सोनम झेंडे यांचा पराभव केला. महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत कोद्रे यांना ८३ तर झेंडे यांना ४१ मते पडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे २८ नगरसेवक या निवडणुकीत तटस्थ राहिले. 
चंचला कोद्रेंविरोधात कॉंग्रेसच्या लक्ष्मी घोडके आणि भाजप-शिवसेना युतीच्या सोनम झेंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पैकी घोडके यांनी गुरुवारी निवडणुकीपूर्वी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे महापालिकेतील पक्षीय बलाबल लक्षात घेता राष्ट्रवादीच्या कोद्रे यांच्या विजय निश्चित मानला जात होता.
पक्षाने दिलेल्या आदेशानुसार वैशाली बनकर यांनी त्यांच्या महापौर पदाचा राजीनामा गेल्या महिन्यात दिला. त्यानंतर उर्वरित एका वर्षासाठी महापौर निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. विभागीय आयुक्तांनी निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार गुरुवारी या पदासाठी निवडणूक घेण्यात आली.
विरोधी पक्षनेता पदाबाबत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात समझोता झाल्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कॉंग्रेसचा अर्ज मागे घेतला जाईल, असे आधीच ठरविण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी सकाळी घोडके यांचा अर्ज मागे घेण्यात आला. त्यानंतर निवडणूक झाली. त्यामध्ये कोद्रे विजयी झाल्या.