पुणे : ‘काळ आला होता पण, वेळ आली नव्हती’, असे म्हटले जाते त्याचा अनुभव एका गिर्यारोहकाला आला. गिर्यारोहण करताना संकटात सापडलेल्या या गिर्यारोहकाला आयुष्याचा दोर बळकट असल्याची प्रचिती त्याचवेळी तेथे देवदूत बनून आलेल्या गिर्यारोहकांच्या चमूकडून वेळेवर मिळालेल्या मदतीने आली. भावी जीवन ‘चंदेरी’ असल्याची भावना या गिर्यारोहकाला चंदेरी किल्ल्यावर आली.

वांगणी – बदलापूर परिसराजवळील चंदेरी किल्ल्यावर चढाई दरम्यान घसरलेल्या एका गिर्यारोहकला वाचविण्यात गिर्यारोहण संघाला यश आले. गडाच्या एका अवघड वाटेवरून गिर्यारोहक घसरून दरीत अडकला होता. माऊंट एव्हरेस्ट मोहिमेच्या सरावासाठी चंदेरी किल्ल्यावर आलेल्या गिरीप्रेमी संस्थेच्या गिर्यारोहकांच्या गटाने तातडीने केलेल्या मदतीमुळे संकटात सापडलेल्या अभय पांडे या गिर्यारोहकाचे प्राण वाचले.

गिरीप्रेमी संस्थेचे मिहीर जाधव, हेमंत जाधव, गुरु, विशाल गोदडे, रवी पवार, रवी पाटील, रुद्र मोहापात्रा, वंगेश गायकवाड आणि गणेश या गिर्यारोहकांचा गट शनिवारी चंदेरी गडावर गेला होता. त्याचवेळी दुसऱ्या एका गटातील गिर्यारोहक गडावर चढाई करत होते. त्यातील एका गिर्यारोहकाचा चढाई दरम्यान एका अवघड ठिकाणी घसरून अपघात झाला. त्या गटातील काही सदस्यांनी मिहीर जाधव यांच्याकडे मदत मागितली. त्या वेळी सुमारे १५० मीटर खोल दरीच्या काठावर गिर्यारोहक अभय पांडे गवताला धरून लोंबकळत असल्याचे दिसले.

मिहीर यांनी तातडीने दोर दगडाला अडकवून रॅपलिंग करून खाली उतरत पांडे यांना सुरक्षितरित्या बांधले. वर थांबलेल्या रवी पवार आणि रुद्र मोहापात्रा यांनी डिसेंडरच्या साहाय्याने पांडे यांना वर खेचून सुरक्षित स्थळी आणले. कोणालाही दुखापत झाली नाही. मिहिर यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने पांडे यांचे प्राण वाचले. घटनेनंतर मिहीर यांच्या पथकाने अशा अवघड आणि तांत्रिक चढाई करताना प्रशिक्षित व्यक्तींचे मार्गदर्शन घेण्याचे, तसेच योग्य सुरक्षा साहित्य बाळगण्याचे आवाहन केले.

गिर्यारोहण हा साहसी क्रीडाप्रकार असून त्यासाठी योग्य प्रशिक्षण, सराव आणि मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. जीव धोक्यात घालून गिर्यारोहक गिर्यारोहण करत असतात. याचे अशा वेळी दुर्दैवाने अपघात झाला तर मदत करण्यासाठीचे तंत्र आत्मसात करणेही गरजेचे असते. मिहीर आणि त्यांच्यासमवेत असलेल्या गिर्यारोहकांनी प्रसंगावधान राखून संकटात सापडलेल्या गिर्यारोहकाला वेळेवर सहकार्य करून त्याचे प्राण वाचविण्यात यश मिळविले याचा आनंद आणि समाधान आहे. गिर्यारोहक हे राष्ट्राची संपत्ती असतात याचे दर्शन या प्रसंगातून घडले. – उमेश झिरपे, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ.