पुणे : जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी अजित पवार, तर चंद्रकांत पाटील यांना अमरावती आणि सोलापूर जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. एकीकडे पाटील यांची उचलबांगडी केल्याची चर्चा असताना गुरुवारी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून पाटील यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आणि जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) कामांचा प्रशासकीय आढावा घेतला. या बैठकीत ‘मी आता पुण्याचा पालकमंत्री नाही. मात्र, पुणे जिल्ह्यातील मंत्री असल्याने सहपालकमंत्री आहे. त्यामुळे पुण्यातील विकासकामांचा दर दोन महिन्यांनी प्रशासकीय आढावा घेणार आहे,’ असे सांगत आता चंद्रकांत पाटील यांनीही ‘मी पुन्हा येईन’ असे वरिष्ठ अधिकाऱ्यांना बजावले.

राज्य सरकारकडून बुधवारी पालकमंत्रिपदांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची माळ अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गळ्यात पडली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. राज्यात सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्री पाटील यांना सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले असल्याने शहरासह जिल्ह्यातील भाजपाच्या गोटात नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील विकासकामांचा दर दोन महिन्यांनी मी स्वत: आढावा घेणार असल्याचे बजावले.

हेही वाचा – आरक्षणासाठी मराठा सेवा संघ आक्रमक; दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींना धडा शिकविण्याचा निर्धार

दरम्यान, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा परिषद आणि राज्यस्तर यंत्रणेकडील सन २०२२-२३ मध्ये मंजूर कामांच्या प्रगतीचा आढावा पाटील यांनी गुरुवारी घेतला. सन २०२२-२३ मध्ये मंजूर कामे दोन वर्षांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक असल्याने निधी अखर्चित राहू नये यासाठी या कामांचा वेग वाढवून डिसेंबरच्या आत ती पूर्ण करण्यात यावीत. कार्यारंभ आदेश देणे प्रलंबित असलेल्या प्रकरणात तातडीने कार्यवाही करत कामांना सुरुवात करावी. ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान, मोठ्या ग्रामपंचायतींसाठी गावांतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भुयारी गटार, सांडपाणी व्यवस्थापन आदी कामांचा आढावा घेण्यात आला.

हेही वाचा – कोल्हापूरचा विशाल पिंजानी ठरला ‘मिस्टर गे इंडिया २०२३’चा विजेता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार हे राज्यातील सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांनी पुण्यातील विकासकामांबाबत बैठकांचा सपाटा लावला आहे. आता ते पालकमंत्री झाल्याने पुण्यावर त्यांचाच वरचष्मा राहणार असल्याची चर्चा आहे. मात्र, नियमानुसार पाटील हे कोथरूडचे लोकप्रतिनिधी असून, त्यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण खाते आहेत. त्यामुळे ते आता पालकमंत्री नसले, तरी जिल्ह्याचे ‘सहपालकमंत्री’ म्हणून कायम राहणार आहेत. तसेच लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार विकासकामांच्या निधीवाटपाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे गुणोत्तर निश्चित करणार आहेत. परिणामी पवार यांना पुण्यात मनमानी पद्धतीने कारभार हाकता येणार नाही, असेच पाटील यांनी गुरुवारच्या बैठकीत स्पष्ट केले.