पुणे : शरद पवार यांना भारतीय जनता पक्षाबरोबर युती हवी होती. मात्र त्यांना मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस नको होते, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. भाजपाच्या कसब्यातील उमेदवाराच्या प्रचारार्थ आलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना हा दावा केला. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये, हाच शरद पवार यांचा एकमेव अजेंडा होता, हे मी यापूर्वीच सांगितले आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसपुढील अडचणी वाढतील. पक्ष विस्ताराला मर्यादा येतील, याची जाणीव शरद पवार यांना होती. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस शरद पवार यांना नको होते, असे चंद्रशेखर बावनुकळे यांनी सांगितले.
हेही वाचा – पिंपरी चिंचवड : ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले यांच्यावर जीवघेणा हल्ला
फडणवीस मुख्यमंत्री म्हणून नको, अशी भूमिका नेहमीच त्यांनी मांडली आहे. शरद पवार हे फडणवीस द्वेषी आहेत. त्यांना राज्यात कोणताही मुख्यमंत्री चालणार होता, मात्र फडणवीस नको होते. फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये म्हणून शरद पवार काहीही करू शकतात, असे बावनकुळे म्हणाले.
