पुणे : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील पहिली ते आठवीच्या पात्र विद्यार्थ्यांना त्रिस्तरीय आहार (‘थ्री कोर्स मील’) देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्रिस्तरीय आहार देण्यात स्थानिक पातळीवर अडचणींमुळे त्यात बदल करून पोषण आहारासाठी बारा पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र, नव्या पाककृतींतील गोड खिचडी, नाचणी सत्त्व हे पदार्थ विद्यार्थ्यांना देण्यासाठी सरकारकडून साखर किंवा अतिरिक्त निधी देण्यात येणार नाही. शालेय व्यवस्थापन समितीने लोकसहभागाद्वारे साखर उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शालेय शिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ४५० ग्रॅम उष्मांक, १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ७०० ग्रॅम उष्मांक, २० ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो. त्यानुसार विद्यार्थ्यांना तांदळापासून केलेल्या पाककृती पोषण आहारात देण्यात येत होत्या. मात्र, या आहारात विविधता आणण्यासाठी डाळी, तांदूळ, मोड आलेले कडधान्य, खीर यांचा समावेश करून थ्री कोर्स मीलअंतर्गत नव्या पाककृती निश्चित करण्यात आल्या. थ्री कोर्स मीलची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी करण्यात अडचणी येत असल्याने या पाककृतींमध्ये सुधारणा करण्यासाठी लोकप्रतिनिधी, बचत गट, स्वयंपाकी-मदतनीस संघटना यांनी शासनाला निवेदने दिली होती. त्या अनुषंगाने केंद्र शासनाने निश्चित केलेला प्रति दिन आहार खर्चाची मर्यादा लक्षात घेऊन आहार पद्धतीत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नव्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना देण्यासाठी १२ पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना वेगवेगळे पदार्थ देण्याच्या दृष्टीने पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत. आठवड्यातील कोणत्या दिवशी कोणती पाककृती निश्चित करायची याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने, तसेच मुंबई महापालिका क्षेत्रासाठी बृहन्मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निर्णय घ्यावा. या समितीच्या निर्णयानुसारच आहार देणे बंधनकारक राहील. अंडा पुलाव आणि गोड खिचडी, नाचणी सत्त्व या पाककृती पर्यायी स्वरूपात आहेत. केंद्र शासनाने योजनेअंतर्गत लोकसहभाग वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने दोन पाककृती आणि अन्य पाककृतींसाठी आवश्यक असणारी साखर लोकसहभागातून देण्याचा प्रयत्न करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

निश्चित केलेल्या नव्या पाककृतींमध्ये

व्हेजिटेबल पुलाव, मसाले भात, मटार पुलाव, मूगडाळ खिचडी, चवळी खिचडी, चणा पुलाव, सोयाबीन पुलाव, मसुरी पुलाव, मूग शेवगा वरण भात, मोड आलेल्या मटकीची उसळ, अंडा पुलाव, गोड खिचडी, नाचणी सत्त्व यांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोषण आहार योजनेत आजवर अनेकदा बदल झाले. मात्र, गेल्या काही वर्षांत योजनेसाठी अतिरिक्त निधी देण्यात आला नाही. आता नव्याने पाककृती निश्चित करताना अधिकच्या निधीचीही तरतूद करणे गरजेचे आहे. शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेला निर्णय म्हणजे ‘आदेश आमचा, निधी तुमचा’ अशी स्थिती आहे, अशी टीका माजी मुख्याध्यापक महेंद्र गणपुले यांनी केली.